जंतर-मंतर या ठिकाणी झालेलं विद्यार्थी आंदोलन प्रचंड चर्चेत राहिलं. याचं कारण म्हणजे सीजेपीच्या नेतृत्वात झालेलं हे पहिलं आंदोलन होतं आणि या आंदोलनातली मागणी मान्य झाली, ती मागणी होती धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची. या आंदोलनाला पाठिंबाही मिळाला. पण जेन झीच्या भाषेवर टीकाही झाली. खासकरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना ज्या पद्धतीने शिवीगाळ केली गेली त्यावर बरीच टीका झाली. यानंतर पंतप्रधानांनी एक व्हिडीओ पोस्ट करत सगळ्यांना माफ करत असल्याचं जाहीर केलं. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत अपशब्द वापरणाऱ्या एका मुलीच्या आईने तिचा आक्रोश मांडला आहे.
१५ वर्षांच्या मुलीच्या आईने नेमकं काय म्हटलं?
दोन दिवसांपूर्वी नोएडा या ठिकाणी राहणाऱ्या एका विधवा आईने तिच्या १५ वर्षांच्या मुलीसह भाडेतत्त्वावर राहात असलेलं घर सोडलं. त्यांनी सांगितलं आमच्याकडे दुसरा काही पर्यायच उरला नाही. पोलीस आणि इतर अनोळखी लोक आमच्या घरी कधीही येतात. माझ्या मुलीने पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत अपशब्द का वापरले? असा जाब विचारतात. आमचा छळ मांडलाय, पाठलाग केला जातो. मग आमच्याकडे काय पर्याय उरणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत माझ्या मुलीने अपशब्द वापरले. त्याबद्दल तिने माफी मागितली, दिलगिरीही व्यक्त केली. पण आम्ही एक कुटुंब म्हणून अजूनही त्रास सहन करत आहोत असं म्हणत या १५ वर्षांच्या मुलीच्या आईने खंत बोलून दाखवली.
माझी मुलगी दहावीत आहे आणि अनोळखी लोक घरी येऊन त्रास देतात
त्या पुढे म्हणाल्या, मी माझ्या मुलीला एकटीने वाढवते आहे. ती दहावीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्यांना माफ केलं आहे. तरीही आमचा पाठलाग आणि छळ थांबलेला नाही. माझे पती २०१९ मध्ये वारले. माझा लहान मुलगा हा माझ्या सासू आणि सासऱ्यांकडे राहतो. आता दिल्लीतल्या नोएडा भागात आम्हाला रोज त्रास दिला जातो आहे, जाब विचारला जातो आहे त्यामुळे इथली जागा सोडण्याशिवाय आमच्याकडे कुठलाही पर्याय उरलेला नाही असं या महिलेने इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं. अनोळखी माणसं आणि पोलीस आमच्या घरी कुठल्याही वेळी येतात, आम्हाला जाब विचारला जातो, त्रास दिला जातो. मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करते की कृपा करुन आमचा पाठलाग थांबवा, असंही या महिलेने म्हटलं आहे.
मुलीवर आरोप काय आहेत?
१५ वर्षांच्या एका मुलीने जंतर-मंतरच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदींना अश्लाघ्य भाषेत शिवी दिल्याचा आरोप तिच्यावर आहे. त्यानंतर नोएडा पोलिसांनी तिच्या विरोधात तक्रार दाखल केली. यानंतर १ ऑगस्टला या मुलीने एक व्हिडीओ पोस्ट केला. ज्यामध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत जे अपशब्द वापरले त्यासाठी माफी मागत दिलगिरी व्यक्त केली आहे. मी जे बोलले ती माझी पहिली आणि शेवटची चूक होती. यापुढे मी असं वागणार नाही, बोलणार नाही असं या मुलीने म्हटलं आहे.
