एपी, चार्ल्सटन : अमेरिकेत आलेल्या इयान या शक्तिशाली वादळाने अमेरिकेत फ्लोरिडा, दक्षिण कॅरोलिना येथे मोठा विध्वंस केला. आतापर्यंत आलेल्या विध्वंसकारी वादळांपैकी एक असलेले हे वादळ कमजोर झाले असून, अमेरिकेच्या उत्तरेकडे उत्तर कॅरोलिनाकडे ते जात आहे. या वादळाने पश्चिम क्यूबातही मोठे नुकसान झाले.

या वादळामुळे झालेल्या दुर्घटनांत फ्लोरिडात सुमारे ३० जण मृत्युमुखी पडले आहेत. वादळामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने प्राणवायू पुरवठा करणारे यंत्र बंद झाल्याने एका ज्येष्ठ नागरिक दांपत्य मृत्युमुखी पडले. या वादळामुळे झालेल्या मुसळधार पावसात अनेक घरे पाण्याखाली गेली असून, रस्त्यांवर पाणी साचले आहे. एक २२ वर्षीय तरुणी रस्त्यावरील साचलेल्या पाण्याखालील मोठा खड्डा न कळाल्याने त्यात बुडून मृत्युमुखी पडली. एका ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या डोक्यात छताचा भाग पडल्याने ते मृत्युमुखी पडले. अनेक जण पाण्यात वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. फ्लोरिडाचे प्रांतपाल रॉन डिसॅन्टिस यांनी सांगितले, की युद्धपातळीवर मदतकार्य आणि पूरग्रस्तांची सुटका केली जात आहे. प्रचंड वित्तहानी झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.