scorecardresearch

“मी तो पक्षी आहे, ज्याचे घरटे…”, NDTV चा राजीनामा दिल्यानंतर रवीश कुमार भावूक

“कसोटी सामन्यातील खेळाडूप्रमाणे खेळपट्टीवर टिकून राहिलो मात्र…”

“मी तो पक्षी आहे, ज्याचे घरटे…”, NDTV चा राजीनामा दिल्यानंतर रवीश कुमार भावूक
रविश कुमार ( जनसत्ता छायाचित्र )

‘न्यू दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेड’ अर्थात ‘एनडीटीव्ही’चा ताबा सोमवारी अदानी समूहाने घेतला. यानंतर ‘एनडीटीव्ही’चे संस्थापक-प्रवर्तक प्रणॉय आणि राधिका रॉय यांनी प्रवर्तक कंपनी ‘आरआरपीआर होल्डिंग्ज’ म्हणजेच आरआरपीआरएचच्या प्रवर्तक (प्रमोटर) पदाचा राजीनामा दिला होता. त्यातच बुधवारी ( ३० नोव्हेंबर ) ‘एनडीटीव्ही’चे वरिष्ठ कार्यकारी संपादक, ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे देशातील माध्यम विश्वात आणि रवीश कुमार यांच्या चाहत्यांना एकच धक्का बसला.

रवीश कुमार १९९६ सालापासून ‘एनडीव्हीशी’ जोडले गेले होते. अदानी समूहाने ‘एनडीव्हीशी’चा ताबा घेतल्यानंतर अखेर २६ वर्षांनी रवीश कुमार यांनी राजीनामा दिला. ‘रवीश की रिपोर्ट,’ ‘प्राइम टाइम’ या कार्यक्रमाद्वारे रवीश कुमार यांनी समाजाच्या समस्या, देशातीत परिस्थिती, तरुणांच्या नोकऱ्यांबाबत थेट सरकारला प्रश्न विचारले होते.

रवीश कुमार हे राजीनामा देतील, यावर अनेक दिवसांपासून चर्चा होती. त्यावर “जसे पंतप्रधान मोदी मला मुलाखत देतील, ही अफवा आहे, तशीच माझ्या राजीनाम्याची देखील अफवा आहे,” असे रवीश कुमार यांनी म्हटलं होतं. पण, बुधवारी रवीश कुमार यांनी राजीनामा दिल्याने अनेकांना धक्का बसला. राजीनाम्यानंतर आता रवीश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गुरुवारी ( १ नोव्हेंबर ) रवीश कुमार यांनी आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. त्यात रवीश कुमार यांना आतापर्यंतचा प्रवास भविष्यातील योजना, पत्रकारितेतील आव्हान याविषयी भाष्य केलं आहे. रवीश कुमार म्हणाले, “देशात वेगवेगळ्या नावांची अनेक वृत्तवाहिन्या असून ती ‘गोदी मीडिया’ आहेत. आजूबाजूचे जग बदलत होते, पण कसोटी सामन्यातील खेळाडूप्रमाणे खेळपट्टीवर टिकून राहिलो. मात्र, आता कोणतरी सामना संपवून तो ट्वेन्टी-२० मध्ये बदलला होता.”

“जेव्हा देशातील न्यायव्यवस्था डळमळीत झाली होती. सत्तेत असलेल्या लोकांनी अनेकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जनतेने माझ्यावर अपार प्रेम दाखवलं होतं. अन्यथा प्रेक्षकांशिवाय मी काहीच करु शकलो नसतो. मात्र, आजची संध्याकाळ अशी आहे, जिथे पक्षी आपले घरटे पाहू शकत नाही. कारण ते कोणीतरी घेऊन गेलं आहे. पण, तो पक्षी खचून जाईपर्यंत आकाश नक्कीच मोकळे असेल,” असे रवीश कुमार यांनी आपलं उदाहरण देत सांगितलं.

“रोज सकाळी उठल्यावर माझ्या मनात रात्रीचे ९ वाजते होते. दररोज रात्रीच्या प्राइम टाइम शो-साठी ५ ते ७ हजार शब्द लिहून ठेवतं असे. पण आता रात्रीचे ९ वाजणार नाही, किंवा ते प्राइम टाइम नसेल. आता रात्री ९ वाजता काय करू हे मला कळत नाही. मला माध्यमाची आवड असल्याने कदाचीत माझे मन तुटलं आहे. मला तो लाल माइक आठवत राहील,” अशा भावना रवीश कुमार यांनी व्यक्त केल्या.

“मागील काही दिवसांपासून ‘प्राइम टाइम’ शो बंद होता. कारण, प्रेक्षकांच्या आठवणीतून विसरून जाण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र, प्रेक्षक मला विसरले नाहीत. भारतातीत माध्यम बदलली आहेत. पत्रकारिता शिकणाऱ्या तरुणांना ऐवढेच सांगणं आहे की, त्यांना दलालीचे काम करावे लागले,” असेही रवीश कुमार यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 17:40 IST

संबंधित बातम्या