West Asia Conflict: 3 Indian sailors killed near Strait of Hormuz : चालू असलेल्या आखाती युद्धाच्या दरम्यान, भारतीय ध्वज असलेले एक तेलवाहू जहाज (ऑइल टँकर) ‘हॉर्मुझच्या सामुद्रधुनी’तून (Strait of Hormuz) सुखरूप बाहेर पडले आहे, तर इतर २७ जहाजे अजूनही युद्धग्रस्त भागातच अडकलेली आहेत, अशी अधिकृत माहिती सरकारने शुक्रवारी दिली. सरकारने पुढे असेही सांगितले की, हे युद्ध सुरू असताना तीन भारतीय खलाशांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि एक खलाशी अजूनही बेपत्ता आहे. या सर्व जहाजांवर मिळून ७०० हून अधिक खलाशी तैनात आहेत. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात पुकारलेल्या युद्धामुळे इराणने हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर कब्जा मिळवला आहे. त्यामुळे येथील जहाज वाहतूक पूर्णतः थांबली आहे. पर्शियन खाडीला जागतिक बाजारपेठेशी जोडणारा अरुंद मार्ग असलेल्या ‘हॉर्मुझच्या सामुद्रधुनी’तील वाढत्या तणावामुळे, विविध देशांची सरकारे आणि जहाजांच्या कंपन्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नौकानयन मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश के. सिन्हा यांनी सांगितले की, हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये आणि आसपास कार्यरत असलेल्या भारतीय जहाजांवर सरकार सतत लक्ष ठेवून आहे. भारतीय ध्वज असलेले एक जहाज आज हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून बाहेर पडले आहे.”
प्रत्येक भारतीय जहाजाचे सरकारकडून निरिक्षण
या जहाजाबद्दल अधिक माहिती देताना त्यांनी स्पष्ट केले की, हे जहाज सामुद्रधुनीच्या पूर्व दिशेला होते आणि त्याला हा मार्ग ओलांडण्याची गरज नव्हती. हे जहाज भारतात येत नसून आफ्रिकेच्या दिशेने जात आहे, असे त्यांनी नमूद केले. सिन्हा पुढे म्हणाले की, प्रशासन या भागातील सर्व भारतीय जहाजांवर लक्ष ठेवून आहे आणि जहाज कंपन्यांशी जवळून समन्वय साधत आहे. त्यांनी खात्री दिली की, “प्रत्येक भारतीय जहाजाचे सरकारकडून निरीक्षण केले जात आहे.”
हॉर्मुझच्या आसपास अनेक जहाजे
आखाती प्रदेशातील सागरी व्यापारांवर सिन्हा म्हणाले की, हॉर्मुझच्या सामुद्रधुनीच्या आसपासच्या भागात अजूनही भारतीय ध्वज असलेली २७ जहाजे आणि ७०० हून अधिक खलाशी तैनात आहेत. हॉर्मुझ सामुद्रधुनीच्या पश्चिमेला, पर्शियन खाडीमध्ये भारतीय ध्वज असलेली २४ जहाजे आहेत, ज्यावर एकूण ६७७ भारतीय खलाशी आहेत; ही संख्या कालच्या इतकीच आहे. हॉर्मुझ सामुद्रधुनीच्या पूर्वेला, ओमानच्या आखातात पूर्वी चार जहाजे होती. काल त्यांपैकी एक तेलवाहू जहाज, ‘जग प्रकाश’ (Jag Prakash), त्या भागातून बाहेर पडले. परिणामी, आता त्या प्रदेशात भारतीय ध्वज असलेली तीन जहाजे शिल्लक असून त्यावर ७६ भारतीय खलाशी आहेत,” असे त्यांनी नमूद केले.
सिन्हा यांनी संपूर्ण आखाती प्रदेशात काम करणाऱ्या भारतीय खलाशांच्या मोठ्या संख्येवरही प्रकाश टाकला. ते म्हणाले, “संपूर्ण आखाती क्षेत्रात व्यापारी जहाजे आणि ऑफशोअर वेसल्ससह विविध जहाजांवर अंदाजे २३,००० भारतीय खलाशी कार्यरत आहेत. नौकानयन महासंचालनालय (Directorate General of Shipping) त्यांच्या संबंधित एजन्सींच्या माध्यमातून या सर्वांशी सतत संपर्कात आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. नौकानयन मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, जहाज कंपन्यांशी समन्वय राखण्यासाठी भारतातील सर्व बंदरांसाठी ‘मानक कार्यप्रणाली’ (SOP) जारी करण्यात आली आहे, तर एलपीजी (LPG) वाहून नेणाऱ्या जहाजांना बंदरांवर प्राधान्य दिले जात आहे.
