अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील वाढत्या लष्करी संघर्षात होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक बंद करण्यात आल्याने पश्चिम आशियातून इतर देशांना होणारा तेलपुरवठा खंडित होण्याची भीती वाढली आहे. त्यामुळे मंगळवारी तिसर्‍या दिवशी तेलाच्या किमतीत वाढ झाली.

इराणविरोधातील अमेरिका व इस्रायलचे हवाई युद्ध सोमवारी वाढले. इस्रायलने लेबनॉनवर हल्ला केल्यानंतर इराणने आखातील देशांमधील ऊर्जा पायाभूत सुविधा आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तेल टँकरवर हल्ले करून प्रत्युत्तर दिले. होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्यात आली असून या सामुद्रधुनीतून प्रवास करणार्‍या जहाजांना आग लावण्यात येईल, असा इशारा इराणने दिला आहे. इराणच्या इशार्‍यानंतर पश्चिम आशियातून होणारा तेलपुरवठा बंद होण्याच्या भीतीने तेलाच्या किमतीचा भडका उडाला.

जगातील सुमारे २० टक्के तेल आणि नैसर्गिक वायूची वाहतूक होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होते. विमा कंपन्यांनी जहाजांसाठीचे त्यांचे विमाकवच रद्द केल्याने टँकर आणि कंटेनर जहाजेही हा जलमार्ग टाळत आहेत. त्याचा परिणाम तेलाच्या किमतीवर होत आहे. ब्रेंट क्रूड निर्देशांक मंगळवारी ८०.८९ डॉलर प्रति पिंप होता. सोमवारी हा निर्देशांक ८२.३७ डॉलरपर्यंत पोहोचला होता. जानेवारी २०२५ नंतरचा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारा तेलपुरवठा विस्कळीत झाल्याने भारताच्या तेलपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. भारताकडे सुमारे १० कोटी पिंप व्यावसायिक कच्च्या तेलाचा साठा आहे. तो ४० ते ४५ दिवसांसाठी काम करू शकतो, असे ‘केप्लर’ने सांगितले.

भारत सुमारे ८८ टक्के कच्चे तेल आयात करतो. ज्यापैकी ५० टक्क्यांहून अधिक कच्चे तेल पश्चिम आशियातील देशांकडून पुरवले जाते. या तेलपुरवठ्याचा प्रवास होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होत असल्याने त्यावर परिणाम झालेला आहे. पश्चिम आशियातील कच्च्या तेलाचा पुरवठा तात्पुरत्या काळासाठी पूर्णपणे थांबला तर त्याचा तात्काळ परिणाम लॉजिस्टिक आणि किमतीवर होणार आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक जास्त काळासाठी विस्कळीत राहिली तर पुरवठ्याचे धोके तीव्र होतील, असे केप्लर येथील रिफायनिंग आणि मॉडेलिंगचे प्रमुख संशोधन विश्लेषक सुमित रिटोलिया म्हणाले.

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित व्यापाराचे आवाहन

पश्चिम आशियातून मोठ्या प्रमाणात तेल आणि नैसर्गिक वायूची आयात करणार्‍या चीनने दोन्ही बाजूंना युद्ध थांबवण्याचे आवाहन केले. तसेच होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल वाहतूक करणार्‍या जहाजांची वाहतूक सुरक्षितपणे करू देण्याचे त्यांनी आवाहन केले. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनीही या प्रदेशातील तेलाच्या पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांबद्दल अरब नेत्यांमधील चिंता इराणला कळवल्या जातील, असे सांगितले. पश्चिम आशियातील तणाव कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे पुतिन यांनी सांगितले.

कतारने ‘एलएनजी’चे उत्पादन थांबवले

होर्मुझ सामुद्रधुनीतून वाहतूक बंद झाल्याने कतारने द्रवीकृत नैसर्गिक वायूचे (एनएनजी) उत्पादन थांबवले. त्यामुळे आशियातील देशांमध्ये एलएनजीसाठी धावपळ सुरू झाली आहे. भारताने नैसर्गिक वायूच्या विक्रीवर मर्यादा आणली आहे, तर इतर देशांनी आपत्कालीन योजना सक्रिय केल्या आहेत. जपान, तैवान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील सरकारी अधिकार्‍यांनी सांगितले की, त्यांना तात्काळ परिणाम अपेक्षित नव्हता. कारण या महिन्यात येणारी काही जहाजे आधीच पोहोचली आहेत, परंतु युद्ध सुरू राहिल्यास ते त्यांच्या आयात स्रोतांचे विविधीकरण करतील आणि खुल्या बाजारातून एलएनजी खरेदी करतील, असे सांगितले. कतारमधील एलएनजी निर्यातीपैकी ८० टक्क्यांपेक्षा अधिक एलएनजीची निर्यात आशियाई देशांमध्ये केली जाते. कतारने उत्पादन थांबवल्यानंतर भारतातील गॅस कंपन्यांनी मंगळवारी कंपन्यांना पुरवठा कमी केला.

शेअर बाजारात आणखी पडझड शक्य

मुंबई : पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे ‘गिफ्टी निफ्टी’ आणि जागतिक बाजारातील तीव्र घसरणीमुळे बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टी या निर्देशांकांची सुरुवात मोठ्या घसरणीने होण्याची शक्यता आहे. होळीनिमित्त देशांतर्गत भांडवली बाजारात मंगळवारी व्यवहार बंद होते, त्याआधी सोमवारी सेन्सेक्स-निफ्टी तब्बल सव्वा टक्क्यांनी गडगडले आहेत. इराण युद्ध चौथ्या दिवशीही सुरू असल्याने मंगळवारच्या सत्रात गिफ्ट निफ्टी फ्युचर्स ६७१.५ अंशांनी घसरून २४,३२१ पातळीवर व्यवहार सुरू राहिले. यामुळे बुधवारच्या सत्रात देशांतर्गत शेअर बाजारांत घसरणीसह व्यवहार सुरू होण्याची शक्यता आहे.

सध्या तेलाचे दर थोडे वाढले आहेत, पण हे युद्ध थांबले की दरही कमी होतील. ते आधीपेक्षाही कमी होतील असा माझा विश्वास आहे. – डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका