लेबनॉनमधील युद्धविराम करारांनंतर शुक्रवारी उघडलेली होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) अवघ्या २४ तासांत इराणने पुन्हा बंद केली आहे. अमेरिकेने आपल्या बंदरांवरील नाकेबंदी कायम ठेवून ‘वचनभंग’ केल्याचा आरोप करत इराणने या जागतिक स्तरावर महत्त्वाच्या असलेल्या जलमार्गावर पुन्हा “कडक नियंत्रण” मिळवल्याचे शनिवारी जाहीर केले.
नेमके प्रकरण काय?
इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ (IRGC) ने निवेदनात म्हटले आहे की, अमेरिकेने इराणच्या बंदरांकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या जहाजांची नाकेबंदी अद्याप हटवलेली नाही. इराणने या कृतीला “समुद्री चाचेगिरी” असे संबोधले आहे. ‘चाचेगिरी’ म्हणजे समुद्रात किंवा जलमार्गावर जहाजांचे अपहरण करणे, माल लुटणे, सशस्त्र दरोडा टाकणे किंवा खासगी फायद्यासाठी हिंसाचार करणे. त्यामुळे जोपर्यंत अमेरिका इराणच्या जहाजांना पूर्ण स्वातंत्र्य देत नाही, तोपर्यंत होर्मुझच्या सामुद्रधुनीची स्थिती “पूर्ववत” (बंद) राहील, असा इशारा इराणने दिला आहे.
ट्रम्प यांची आक्रमक भूमिका
दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, इराणशी संबंधित व्यवहार १००% पूर्ण होत नाही तोपर्यंत अमेरिकन नौदलाची नाकेबंदी पूर्ण ताकदीने सुरूच राहील. ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट करत म्हटले की, “होर्मुझची सामुद्रधुनी व्यापारासाठी खुली आहे, परंतु इराणच्या बाबतीत अमेरिकेची नाकेबंदी तोपर्यंत सुरू राहील जोपर्यंत आमचा इराणसोबतचा करार पूर्ण होत नाही.”
हॉर्मुझची सामुद्रधुनी आणि जागतिक परिणाम
हॉर्मुझची सामुद्रधुनी हा एक अरुंद पण अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे, जिथून जगातील २०% तेल आणि वायूचा पुरवठा होतो. २८ फेब्रुवारी रोजी इराणवर अमेरिका-इस्रायलने केलेले हल्ले आणि त्यानंतर इराणने आखाती देशांवर केलेल्या प्रतिहल्ल्यांनंतर हा मार्ग व्यावसायिक शिपिंगसाठी पूर्णपणे निरुपयोगी झाला होता. ४७ दिवस जहाजांनी एकतर हा मार्ग टाळला किंवा त्यांना कडक निर्बंधांचा सामना करावा लागला. या अडथळ्यामुळे जागतिक व्यापारावर, विशेषतः ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम झाला आणि कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली.
इराणच्या नव्या अटी
इराणच्या संसदीय आयोगाचे प्रमुख इब्राहिम अझीझी यांनी जाहीर केले आहे की, केवळ IRGC ने अधिकृत केलेली व्यापारी जहाजेच या मार्गावरून जाऊ शकतील आणि या जहाजांना प्रवास करण्यासाठी इराणला ‘टोल’ (शुल्क) भरावा लागेल.
पुढील पाऊल काय?
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील हा तणाव निवळण्यासाठी सोमवारी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे चर्चेची दुसरी फेरी होणार आहे. या युद्धजन्य परिस्थितीवर तोडगा निघणार की ऊर्जा संकट अधिक गडद होणार, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
