US-Iran Conflict : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यानंतर मध्यपूर्वेत तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या संघर्षादरम्यान इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) बंद करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. तसेच या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही जहाजाला आग लावली जाईल असा इशाराही दिला आहे. इराणच्या प्रसारमाध्यमांनी यासंबंधी वृत्त दिले आहे.

इराणने शनिवारी जहाजांसाठी हा निर्यात मार्ग बंद करत असल्याचे सांगताना हा थेट इशारा दिला आहे. या निर्णयामुळे जागतिक तेल पुरवठ्याचा पाचवा हिस्सा विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली असून, यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

“सामुद्रधुनी (होर्मुझ) बंद करण्यात आली आहे. जर कोणी येथून जाण्याचा प्रयत्न केला, रिव्होल्युशनरी गार्ड्सचे हिरो आणि नौदल त्या जहाजांना आग लावतील,” असे गार्ड्स कमांडर इन चिफचे वरिष्ठ सल्लागार इब्राहिम जाबरी स्थानिक माध्यमांशी बोलताना म्हणाले.

होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाचा तेल निर्यात होणार मार्ग आहे. हा जलमार्ग आखाती देशांमधील सर्वात मोठे तेल उत्पादक देश, जसे की सौदी अरेबिया, इराण, इराक आणि संयुक्त अरब अमिरात यांना गल्फ ऑफ ओमान आणि अरबी समुद्राशी जोडतो.

२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यांनंतर हा मार्ग बंद करण्यात आला आहे. इराणवर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी देखील अमेरिकन लष्कराचे तळ असलेल्या मध्यपूर्वेतील देशांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र डागण्यास सुरूवात केली आहे. इराणकडून कतार, कुवेत आणि बहरीन अशा देशांवर हल्ले केले जात आहेत. याबरोबरच युएई, सौदी अरेबिया आणि ओमान या देशांवर देखील इराणने क्षेपणास्त्रे डागली आहेत.

या जलमार्गाचे महत्त्व का आहे?

इस्लामिक रिपब्लिकवर कोणताही हल्ला झाला तर त्याला प्रत्युत्तर म्हणून हा अत्यंत महत्त्वाचा जलमार्ग बंद केला जाईल, ही अनेक वर्षांपासून दिली जाणारी धमकी अखेर इराणने सत्यात उतरवली आहे. जगातील दैनंदिन तेलाच्या वापराच्या सुमारे २० टक्के तेल हे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाते. या खाडीची किमान रुंदी ३३ किलोमीटर आहे. पण जहाजांसाठीची मार्गिका अवघी तीन किलोमीटर रुंद आहे. मात्र तरीही तेल निर्यातदार देशांसाठी ही खाडी अत्यंत मोक्याची आहे. अनेक आयातदार देशही या खाडीतून होणाऱ्या पुरवठ्यावर अवलंबून असतात.

दरम्यान इराण आणि त्यांचे जुने शत्रू असलेले अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाकडे तेल बाजाराचे लक्ष लागले आहे. हा संघर्ष आणखी तीव्र झाल्यास तेल पुरवठा विस्कळीत होऊ शकतो आणि यामुळे या प्रदेश अस्थिर होऊ शकतो.