Strait of Hormuz international naval mission update including European Union strategy : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष संपुष्टात आल्यानंतर होर्मुझची सामुद्रधुनी जहाज वाहतुकीसाठी सुरक्षित बनवण्यासाठी युरोपियन देश हे एक व्यापक आघाडी स्थापन करण्याच्या योजनेवर काम करत आहेत. या योजनअंतर्गत सामुद्रधुनीतील सुरुंग नष्ट करणारी आणि इतर नौदलाची जहाजे तैनात करण्याचा समावेश असणार आहे. मात्र या प्रस्तावापासून अमेरिकेला दूर ठेवले जाण्याची शक्यता आहे, असे वृत्त वॉल स्ट्रीट जर्नलने दिले आहे.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष हे मंगळवारी (एप्रिल १५) म्हणाले होते की, होर्मुझच्या सामुद्रधुनीसाठी प्रस्तावित असलेल्या युद्धानंतरच्या आंतरराष्ट्रीय संरक्षणात्मक मोहिमेतून युद्धात सामील देशांना वगळले जाईल, ज्यामध्ये अमेरिका, इस्रायल आणि इराण यांचा समावेश असेल. या मोहिमेत युरोपियन नौदल हे युएस कमांडशिवाय हे काम करतील, असे वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
ही प्रस्तावित योजना युद्ध संपल्यानंतर पुन्हा या मार्गाने जहाज वाहतूक सुरू व्हावी, यासाठी शिपिंग कंपन्यांमध्ये विश्वास निर्माण करण्याच्या उद्देशाने राबवली जात आहे. दरम्यान अधिकाऱ्यांच्या मते यासाठी अजून काही काळ लागू शकतो.
वॉल स्ट्रीट जर्नलने एका जर्मन अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, जर्मनी देखील युरोपीय देशांच्या या योजनेत सहभागी होण्याची शक्यता आहे. असे झाले तर परदेशातील लष्करी मोहिमांमध्ये सहभागी न होण्याच्या जर्मनीच्या जुन्या भूमिकेत झालेला हा बदल ठरणार आहे.
अमेरिकेकडून इराणच्या बंदरांची नाकेबंदी
यादरम्यान अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने इराणच्या बंदरांची नाकेबंदी केल्याचे स्पष्ट केले आहे, ज्यामुळे ३६ तासांच्या आत सागरी व्यापार ठप्प झाला आहे. या माध्यमातून अमेरिकेने मध्यपूर्वेतील महत्त्वाच्या सागरी मार्गांवर आपले नियंत्रण मिळवले आहे.
यापूर्वी अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने माहिती दिली होती की, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील अमेरिकेच्या नौदलकडून करण्यात आलेल्या नाकेबंदीनंतर पहिल्या २४ तासांत एकाही जहाजाला सामुद्रधुनी ओलांडता आली नाही आणि सहा व्यापारी जहाजांना इराणच्या बंदराकडे परत पाठवण्यात आले.
अमेरिका इराण यांच्यात दुसऱ्यांदा चर्चा
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील दोन दिवसांत पाकिस्तानात इराणबरोबर चर्चा सुरू होऊ शकते, असे ‘न्यूयॉर्क पोस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत सूचित केले आहे. ते म्हणाले, “तुम्ही लक्ष ठेवा. कारण पुढील दोन दिवसांत काहीतरी मोठे घडू शकते आणि आम्हाला खरोखर तिथे जाण्याची इच्छा आहे.” पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असिम मुनीर उत्कृष्ट काम करत आहेत, त्यामुळे हे शक्य झाले असल्याची प्रशंसाही ट्रम्प यांनी केली. ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे पहिल्या फेरीप्रमाणेच दुसऱ्या फेरीसाठीही शुक्रवार ते रविवार या दरम्यानची वेळ निवडली जाऊ शकते.
