Strait of Hormuz Tanker Attack Indian Crew Rescued : होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जात असलेल्या कुवेतचा ध्वज असलेल्या आणि कच्च्या तेलाची वाहतूक करणाऱ्या एका टँकरवर प्रोजेक्टाईलद्वारे हल्ला करण्यात आला. हल्ल्यानंतर टँकरवरील पाच भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. ओमानमधील भारतीय दूतावासाने या बचावकार्यात समन्वय साधला. या कार्यवाहीसाठी दूतावासाने ओमानी अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. याबद्दल सविस्तर वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिले आहे.

‘एमटी काझिमाह ३’ टँकरवर प्रोजेक्टाईलद्वारे हल्ला

भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, ‘एमटी काझिमाह ३’ या कुवेतचा ध्वज असलेल्या टँकरवर होर्मुझच्या सामुद्रधुनीत प्रोजेक्टाईलद्वारे हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना घडली. या हल्ल्यानंतर तातडीने राबवण्यात आलेल्या मोहिमेत टँकरवरील सर्व पाच भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका करून त्यांना सुरक्षितपणे किनाऱ्यावर हलवण्यात आले आहे.

“या घटनेनंतर भारतीय दूतावासाने टँकरवरील पाच भारतीय नागरिकांच्या बचावकार्यामध्ये समन्वय साधला. या पाचही जणांना किनाऱ्यावर सुखरूपपणे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे,” अशी अधिकृत माहिती ओमानमधील भारतीय दूतावासाकडून देण्यात आली आहे.

कुवेतचा ध्वज असलेला हा टँकर कच्च्या तेलाची वाहतूक करत होता. हा टँकर टोगोमधील ‘लोमे’ बंदराच्या दिशेने जात असल्याची माहिती समोर आली आहे. प्रवासात असतानाच त्यावर प्रोजेक्टाईलद्वारे हल्ला करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

ओमानी अधिकाऱ्यांचे भारतीय दूतावासाकडून आभार

बचावकार्यात सहकार्य केल्याबद्दल भारतीय दूतावासाने ओमानी प्रशासनाचे आभार मानले आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीसह पर्शियन आखातातील व्यापारी जहाजांच्या सुरक्षेवर भारत बारकाईने लक्ष ठेवत आहे.

दरम्यान, ‘यूके मेरीटाइम ट्रेड ऑपरेशन्स’नेही ओमानच्या किनाऱ्याजवळ एका कच्च्या तेलाची वाहतूक करणाऱ्या टँकरवर अज्ञात प्रोजेक्टाईलद्वारे हल्ला हल्ला करण्यात आल्याची स्वतंत्र माहिती दिली. या घटनेत सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले असून, अधिकाऱ्यांकडून तपास सुरू आहे.

पर्शियन आखातात ४,५०० हून अधिक भारतीय खलाशी

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी २९ सप्टेंबर रोजी सांगितले होते की, पर्शियन आखातातील विविध व्यापारी जहाजांवर साडेचार हजारांहून अधिक भारतीय खलाशी कार्यरत आहेत. याशिवाय भारताच्या हिताशी संबंधित १२ व्यापारी जहाजांवर सुमारे १६३ भारतीय खलाशी आहेत. त्यामध्ये भारताच्या ध्वजाखालील सहा आणि परदेशी ध्वजाखालील सहा अशा १२ जहाजांचा समावेश आहे. भारतीय नौकानयन मंत्रालयाकडून संबंधित राजनैतिक मोहिमा आणि स्थानिक यंत्रणा यांच्या समन्वयातून या जहाजांच्या हालचाली आणि भारतीय नागरिकांच्या सुरक्षेवर लक्ष ठेवले जात आहे.

व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांबाबत जयशंकर यांच्याकडून चिंता

व्यापारी जहाजे आणि खलाशांच्या सुरक्षेचा मुद्दा अलीकडेच संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतही उपस्थित झाला होता. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आखात, लाल समुद्र आणि काळ्या समुद्रातील व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली होती.

व्यापारी जहाजांच्या सुरक्षेसाठी भारत लायबेरियासह २३ देशांच्या आंतरराष्ट्रीय आघाडीत सहभागी झाला आहे, असेही जयशंकर यांनी स्पष्ट केले होते. व्यापारी जहाजे, ऊर्जापुरवठा आणि आंतरराष्ट्रीय व्यापार सुरळीत सुरू राहावा यासाठी आखातातील परिस्थिती नियंत्रणात आणावी, असे आवाहनही त्यांनी केले.