Iran President Masoud Pezeshkian states Strait of Hormuz reopen : अमेरिका आणि इराण या दोन देशांतील युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनीवरील जलवाहतूक अडचणीत आली आहे. हा विषय आता जगभरासाठी अत्यंत संवेदनशील ठरला आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने हा धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा सागरी मार्ग बंद केला असून, वॉशिंग्टननेही स्वतःची नाकेबंदी (ब्लॉकेड) लागू केली आहे. आता इराणने हा सागरी मार्ग पुन्हा सुरू करण्याची शक्यता अमेरिकेच्या पुढील पावलांवर अवलंबून ठेवली आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी म्हटलं आहे की, जर अमेरिकेने आपली नाकेबंदी आणि इराणविरोधी कारवाया थांबवल्या, तर इराण एका आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त सागरी संरचनेसाठी काम करण्यास तयार आहे.

इंडिया टुडेला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत पेझेश्कियान यांनी सांगितलं की, इराण या महत्त्वाच्या सागरी मार्गासाठी एका विशिष्ट आराखड्याबाबत ओमानसोबत वाटाघाटी करत आहे. सामुद्रधुनीच्या सध्याच्या स्थितीबद्दल विचारलं असता, पेझेश्कियान यांनी इराणच्या भूमिकेचं समर्थन केलं. अमेरिका आणि तिच्या मित्र-देशांकडून होणारे हल्ले आणि दबावाला इराण केवळ चोख उत्तर देत असल्याचं त्यांनी सांगितलं. पेझेश्कियान म्हणाले, “तुम्हीच पाहा, मला नाही वाटत की हेजबोला किंवा आम्ही या संघर्षाची सुरुवात केली आहे. हे सर्व गट स्वतःचा बचाव करत आहेत.” अमेरिकेने या भागात स्वतः शस्त्रे आणून प्रादेशिक मार्ग का रोखले आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

“अमेरिका कोणत्या आधारावर आमच्या प्रदेशावर हल्ले करत आहे आणि आमचे मार्ग रोखत आहे? आणि आम्ही काहीच करू नये? जर आपण जिवंत असू तर आपल्याला उत्तर द्यावंच लागेल. मृत झाल्यावर आपण उत्तर देऊ शकत नाही. त्यामुळे आपण जिवंत आहोत आणि आपण उत्तर देऊ”, असं पेझेश्कियान यांनी सांगितलं.

होर्मुझ मार्ग पुन्हा सुरू करण्यासाठीची अट

पेझेश्कियान यांनी स्पष्ट केलं की, होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू करणं हे इराणवरील अमेरिकन दबाव, नाकेबंदी आणि निर्बंध संपवण्याशी जोडलेलं असेल. या निर्बंधांमुळे सामान्य इराणी नागरिकांची परिस्थिती बिकट होत असल्याचा आरोप करत इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं की, “जर अमेरिकेने ही नाकेबंदी आणि निर्बंध थांबवले, कारण निर्बंधांचा अर्थ रुग्णांचा जीव घेणे, लोकांना बेरोजगार करणे, गरिबी, असंतोष आणि इतर हजारो समस्या निर्माण करणे असा होतो.” लष्करी कारवाईत अपयश आल्यानंतर वॉशिंग्टन आर्थिक उपायांद्वारे सामान्य नागरिकांवर दबाव आणत असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. “आणि आता जेव्हा त्यांना युद्धाच्या माध्यमातून आपले उद्दिष्ट साध्य करता आले नाही, तेव्हा ते आर्थिक कारवायांच्या माध्यमातून हे करत आहेत. पण ते अपयशी ठरतील”, असं पेझेश्कियान म्हणाले.