Strait Of Hormuz Opened For India: अमेरिका-इस्रायलविरुद्ध इराण संघर्ष सुरु झाल्यापासून बंद करण्यात आलेली होर्मुझ सामुद्रधुनी भारतासह इतर काही देशांसाठी खुली करण्यात आली आहे. स्वत: इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी आज (गुरुवारी) याबाबत माहिती दिली. जवळपास चार आठवड्यांपासून बंद असणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीमुळे भारतासह अनेक देशांमध्ये इंधन आणि गॅसचा गंभीर तुटवडा निर्माण झाला आहे. सामुद्रधुनी खुली झाल्याने भारताला मोठा दिलासा मिळणार आहे. 

इराणचे परराष्ट्रमंत्री काय म्हणाले?

“आम्ही भारत, पाकिस्तान, चीन, इराक, रशियासह मित्रराष्ट्रांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करत आहोत”, अशी माहिती इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी दिली आहे. मुंबईमधील इराणच्या वाणिज्य दूतावासाने याबाबत अराघची यांच्या फोटोसह माहिती दिली आहे. 

होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याची मागणी

संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी देखील होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची मागणी केली होती. होर्मुझ बंद असल्यामुळे तेल, गॅस वाहतुकीला खीळ बसल्याचे त्यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते. तसेच, संघर्षावर मार्ग काढून युद्ध तात्काळ समाप्त करण्याची मागणी केली होती.

अँटोनियो गुटेरेस यांनी काय पोस्ट केली होती?

होर्मुझ सामुद्रधुनी दीर्घकाळ बंद असल्यामुळे तेल, गॅस आणि खतांच्या वाहतुकीला खीळ बसली आहे. याचा गंभीर फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. युद्धामुळे बसणाऱ्या झळा कमी करण्यासाठी संयुक्त राष्ट्राचे प्रयत्न सुरु आहेत. आणि युद्ध समाप्त करणे हाच परिणाम कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, अशी एक्स पोस्ट गुटेरेस यांनी केली होती. 

अमेरिका – इस्रायल आणि इराणला आवाहन

गुटेरेस यांनी अमेरिका आणि इस्रायला देखील महत्वाचे आवाहन केले होते. आता युद्ध समाप्त करण्याची वेळ आहे. जीवितहानी वाढली आहे. जागावर आर्थिक परिणाम गंभीर होत चालले आहेत. इराणने देखील शेजारी राष्ट्रांवर हल्ले करु नयेत असेही आवाहनही गुटेरेस यांनी केले होते.

होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्यात आल्यापासून भारतासह इतर देशांमध्ये इंधनासह, गॅस टंचाई निर्माण झाली आहे. होर्मुझ सामुद्रधुनी सुरु करण्याबाबत इराणला संयुक्त राष्ट्रासह इतर देशांनी देखील आवाहन केले होते. दरम्यान, भारतासह मित्रराष्ट्रांसाठी इराणने सामुद्रधुनी खुली केल्याने भारतीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.