Strait of Hormuz Tanker Fire : होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ ओमानच्या किनाऱ्यावर मंगळवारी पहाटे एका क्षेपणास्त्राच्या धडकेमुळे एका टँकरला आग लागल्याची माहिती ब्रिटीश लष्कराने दिली आहे. ‘युनायटेड किंगडम मॅरीटाईम ट्रेड ऑपरेशन्स’ (UKMTO) केंद्राने सांगितलं की, ओमानमधील लिमाहच्या पूर्वेला या टँकरवर हल्ला झाला.

UKMTO च्या माहितीनुसार, हा टँकर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून दक्षिणेकडे ओमानच्या आखाताच्या दिशेने प्रवास करत असताना एका क्षेपणास्त्राने जहाजाच्या डाव्या बाजूला धडक दिली. या धडकेमुळे जहाजावर आग लागली, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. ‘अॅक्सिओस’ने एका अमेरिकी अधिकाऱ्याच्या हवाल्याने संबंधित वृत्त दिलं आहे.

सागरी संस्थेने सांगितलं की अधिकारी या घटनेचा तपास करत असून, या भागातून प्रवास करणाऱ्या इतर जहाजांना खबरदारी बाळगण्याचा आणि कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित माहिती देण्याचा सल्ला दिला आहे.

अमेरिकेचा इराणवर आरोप

या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही देशाने स्वीकारलेली नसली, तरी अमेरिकेने यासाठी इराणला जबाबदार धरलं आहे. ‘ॲक्सिओस’ (Axios) ने दोन अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, तेहरानच्या (इराण) लष्कराने सोमवारी रात्री होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यावसायिक जहाजांवर किमान दोन क्षेपणास्त्रे डागली. या प्रदेशातील अनेक आठवड्यांच्या वाढत्या लष्करी तणावानंतर, अमेरिका आणि इराण यांच्यात एकमेकांवर हल्ले न करण्याबाबत झालेल्या करारानंतरही ही ताजी घटना घडली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीमधील आधीच्या एका हल्ल्यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांवर अनेक हल्ले केले होते, ज्यानंतर कतारमधील एका अप्रत्यक्ष बैठकीत थेट संघर्ष थांबवण्यावर दोघांचे ऐकमत झाले होते.

अमेरिकन लष्कराने यापूर्वी सांगितलं होतं की, होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून जाणाऱ्या एका व्यावसायिक जहाजावरील हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून त्यांनी इराणमधील लक्ष्यांवर हल्ले केले होते. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, २५ जून रोजी ओमानच्या किनाऱ्यावरून होर्मुझच्या सामुद्रधुनीबाहेर पडत असलेल्या सिंगापूरचा ध्वज असलेल्या ‘M/V एव्हर लव्हली’ (M/V Ever Lovely) या मालवाहू जहाजावर इराणने ड्रोन हल्ला केला होता. त्यानंतर अमेरिकेच्या लष्कराने इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन साठवणूक केंद्रांना, तसेच किनारपट्टीवरील रडार केंद्रांना लक्ष्य केले होते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही इराणच्या या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, हा शस्त्रसंधी कराराचा मूर्खपणे केलेला भंग असल्याचं म्हटलं आहे. व्यावसायिक जहाजावरील ड्रोन हल्ल्यामुळे इराणला याचे परिणाम भोगावे लागतील का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ट्रम्प म्हणाले, “ते तुम्हाला लवकरच समजेल.” मात्र, इराणने या सुरुवातीच्या हल्ल्याची जबाबदारी नाकारली आहे. त्यानंतर अमेरिकेने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने कुवेत आणि बहरीनमधील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केले होते. यामुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला होता, परंतु नंतर दोन्ही बाजू या परिस्थितीतील तणाव कमी करण्यास सहमत झाल्या.