इराण आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीत वाढलेल्यया तणावाचा फटका तेलाच्या वाहतुकीला बसणार आहे. सध्या भारतीय तेलशुद्धीकरण कंपन्यांकडे किमान १० दिवस पुरेल इतके कच्चे तेल असून आणखी ५ ते ७ दिवस पुरेल इतका इंधन साठा आहे. त्यामुळे भारताला तातडीने तेलाची टंचाई जाणवण्याची शक्यता नाही, पण नजीकच्या काळात कच्च्या तेलाचे दर वाढण्याची आणि त्याचा अर्थकारणावर व्यापक परिणाम होण्याची भीती आहे, असे अधिकारी आणि तज्ज्ञांनी सांगितले.
इराक, सौदी अरेबिया, यूएई आणि कुवेत येथून आयात केल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाची वाहतूक होर्मुझच्या सामुद्रधुनीतून केली जाते. या मार्गाने जगातील २० टक्के द्रव पेट्रोलियम पदार्थ आणि एलएनजीची वाहतूक होते. दररोज हे प्रमाण सुमार २५ ते २७ लाख पिंपे इतके आहे. हे प्रमाण भारताच्या एकूण आयातीच्या जवळपास निम्मे आहे.
पश्चिम आशियातील घडामोडींमुळे भू-राजकीय अस्थिरता वाढल्यामुळे भारतासमोर इराणव्यतिरिक्त अमेरिका, पश्चिम आशियातील अन्य देश, दक्षिण अमेरिका आणि प्रसंगी रशियाकडूनही तेल विकत घेण्याचा पर्याय आहे.
