नेपाळमधील प्रसिद्ध ‘शे-फोक्सुंडो नॅशनल पार्क’ परिसरात झालेल्या बर्फवृष्टीमुळे ६ भारतीय पर्यटक अडकले आहेत. यामध्ये २ महिलांचा समावेश आहे. सुरक्षा रक्षक आणि नेपाळी मार्गदर्शकाने वारंवार दिलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करून हे पर्यटक पुढे गेले होते. शनिवारी दुपारपासून या पर्यटकांचा संपर्क तुटला असून त्यांना बाहेर काढण्यासाठी नेपाळ प्रशासनाने आणि लष्कराने तातडीने बचावकार्य सुरू केले आहे. ‘हिंदूस्तान टाइम्स’ ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.
नेपाळच्या दोल्पा जिल्ह्यात नेमकं काय घडलं?
नेपाळमधील दोल्पा जिल्ह्यातील ‘शे-फोक्सुंडो’ नगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक ८ मधील ‘धो’ परिसरात ही घटना घडली. अचानक झालेल्या प्रचंड बर्फवृष्टीमुळे संपूर्ण भाग बर्फाच्छादित झाला असून, तेथील दळणवळण आणि मोबाईल संपर्क यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली आहे.
पर्यटक संकटात सापडल्याची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने तपास मोहीम हाती घेतली. दोल्पा जिल्ह्याच्या मुख्य जिल्हा अधिकारी जुनू ढकाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्यटकांचे नेमके लोकेशन ट्रेस करण्यात यश आले आहे.
“पर्यटक ज्या भागात अडकले आहेत तो परिसर आम्ही शोधून काढला आहे. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी नेपाळी लष्कराचे हेलिकॉप्टर घटनास्थळाकडे रवाना झाले असून, लवकरच सर्वांना सुरक्षित वाचवले जाईल,” अशी माहिती जुनू ढकाल यांनी दिली.
गाईड अन् सुरक्षारक्षकांचा इशारा डावलला
स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या पर्यटकांनी नेपाळी गाईड आणि स्थानिक सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या इशाऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. परिसरात हवामान खराब असून मुसळधार बर्फवृष्टी होत असल्याने पुढे न जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र, हे पर्यटक गाईडला मागे सोडून शे-फोक्सुंडो तलावाच्या दिशेने पुढे निघून गेले.
शनिवारी संध्याकाळी पर्यटकांशी संपर्क होत नसल्याचे लक्षात येताच गाईडने तातडीने दोल्पा जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. त्यानंतर रविवारी सकाळपर्यंत या पर्यटकांशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, पर्यटकांचे लोकेशन निश्चित झाले असल्याने त्यांना ‘बेपत्ता’ मानले जात नसून ते केवळ बर्फामुळे अडकले आहेत. लष्कराची रेस्क्यू टीम लवकरच त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे.
काय आहे ‘शे-फोक्सुंडो’ तलावाचे वैशिष्ट्य?
- समुद्रसपाटीपासून उंची: सुमारे ३,६०० मीटर
- खोली: सुमारे १४५ मीटर (हा नेपाळमधील सर्वात खोल तलाव आहे)
- विशेष ओळख: शे-फोक्सुंडो नॅशनल पार्कच्या दुर्गम आणि डोंगराळ भागात हा तलाव वसलेला आहे. हिवाळ्यात किंवा तीव्र बर्फवृष्टीच्या काळात या भागातील रस्ते बंद होतात आणि संपर्क यंत्रणा कोलमडते.
