नागरिकांनी सायकलने भाजी बाजारात जावे, आरोग्यासाठी उत्तम!

मध्य प्रदेशचे ऊर्जा मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर यांनी लोकांनी सायकलवर भाजी बाजारात जाण्याचा सल्ला दिला.

BJP Agitation

भाजप नेत्यांची इंधनदरवाढीवर विचित्र आणि हास्यास्पद स्पष्टीकरणे

पाच राज्यांतील विधानसभांचे निवडणूक निकाल २ मे २०२१ रोजी जाहीर झाल्यानंतर पेट्रोलचे भाव अनेक राज्यात लिटरला शंभर रुपयांच्या पुढे गेले असून त्यावर भाजप नेते आता हास्यास्पद व विचित्र स्पष्टीकरणे देत सुटले आहेत. भाजप नेत्यांनी इंधनदरवाढीवर केलेल्या स्पष्टीकरणाची काही मासलेवाईक उदाहरणे सामोर येत आहेत.

मध्य प्रदेशचे ऊर्जा मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर यांनी लोकांनी सायकलवर भाजी बाजारात जाण्याचा सल्ला दिला. त्यांनी मंगळवारी माध्यमांना सांगितले की, पेट्रोल व डिझेल हे भाजीबाजारात जाणारे लोक वापरतात. ते सायकलवर बाजारात का जात नाही त्यामुळे आरोग्य उत्तम राहून प्रदूषणही कमी होईल. आरोग्यासाठी पेट्रोल व डिझेल आवश्यक आहे का, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. इंधन दरवाढीचा पैसा कुणा नेत्याच्या घरात जात नाही तो गरिबांसाठी खर्च होतो. लोकांना दिवाळीपर्यंत मोफत शिधा देण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.

यावर्षी फेब्रुवारीत भाजप नेते व बिहारचे मंत्री नारायण प्रसाद यांनी सांगितले होते की, इंधन दरवाढीचा फटका सामान्यांना बसणार नाही ते सार्वजनिक वाहतूक सुविधा वापरू शकतात. सामान्य लोक बसने प्रवास करतात. फार थोडे लोक खासगी वाहनांनी प्रवास करतात. केवळ राजकीय नेतेच या दरवाढीवर ओरड करीत आहेत. लोकांना दरवाढीची सवय झाली आहे.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी असे म्हटले होते की, करोना उपाययोजनांमुळे सरकारचा खर्च वाढला आहे. सरकार पैसे वाचवून कल्याण योजनांवर खर्च करीत आहे. काँग्रेसची राज्ये असलेल्या पंजाब, राजस्थान व महाराष्ट्रात इंधनाचे दर जास्त का आहेत याचे उत्तर राहुल गांधी यांनी द्यावे. त्यांना जर गरिबांचा कळवळा असेल तर त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कर कमी करायला सांगावेत. मुंबईत इंधनदरवाढ खूप जास्त आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी असे म्हटले होते की, इंधनदरवाढ झाली नाही तर ते सगळ्यांनाच आवडेल पण आता किमती वाढत आहेत. त्यामुळे विद्युत वाहनांशिवाय पर्याय नाही. त्यांचा पर्यावरणावर घातक परिणाम होत नाही. पेट्रोल व डिझेलची वाहने प्रदूषण करतात. त्यांना पाठिंबा देताना भाजप नेते आर.के. सिन्हा यांनी असा सल्ला दिला होता की, लोकांनी जीवाश्म इंधनांचा वापर कमी करून विद्युत वाहने वापरावीत. मार्च २०२० मध्ये परराष्ट्र राज्य मंत्री व्ही. मुरलीधरन यांनी केरळात असे सांगितले होते की, आंतरराष्ट्रीय किमती खाली जातात तेव्हा आपल्याकडे त्या वाढतात पण असे असले तरी ते वाढीव पैसे कुणी काही घरी घेऊन जात नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Strange and ridiculous explanations of bjp leaders on fuel price hike akp

ताज्या बातम्या