नोएडा या ठिकाणी असलेल्या गौतम बुद्ध नगर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने चार वर्षांच्या मुलीवर भटक्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्याच्या प्रकरणात एक लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. नोएडा येथील केंद्रीय विहार २ येथील रेसिंडट वेलफेअर असोएशनला हे आदेश देण्यात आले आहेत. चार वर्षांच्या एका मुलीवर भटक्या कुत्र्याने हल्ला केला होता आणि त्यावेळी ही मुलगी जखमी झाली होती. हे प्रखरण ग्राहक निवारण आयोगाकडे आल्यानंतर हा निवाडा करण्यात आला आहे.
ग्राहक तक्रार निवारण आयोगाने काय म्हटलं आहे?
ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष अनिल कुमार पुंडीर आणि सदस्य अंजू शर्मा यांनी रेसिडंट वेलफेअर असोसिएशनला चार वर्षांच्या मुलीवर झालेल्या भटक्या कुत्र्याच्या हल्ला प्रकरणात दोषी ठरवलं आहे. या मुलीला झालेल्या जखमा, तिला या हल्ल्यामुळे झालेला मानसिक त्रास हे लक्षात घेऊन आयोगाने असोसिएशनला एक लाख रुपयांची भरपाई देण्यास सांगितलं आहे. तसंच कायदेशीर खर्चाची भरपाई म्हणून अतिरिक्त ५ हजार रुपये द्यावेत असंही आयोगाने म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.
नेमकं काय घडलं?
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या चार वर्षांच्या मुलीवर रेसिडंट वेल्फेअर असोसिएशनच्या कार्यालयाच्या मागे असलेल्या बागेत भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. रस्त्यावरुन जाणाऱ्या एका माणसाने या मुलीला वाचवलं. मात्र या हल्ल्यात मुलीच्या पाठीवर गंभीर जखमा झाल्या. तक्रारदारांनी असंही म्हटलं आहे की हा पहिला हल्ला नव्हता. याआधीही या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक, तसंच घरकाम करणाऱ्या महिला, नोकरदार पुरुष, तरुण या सगळ्यांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ले केले आहेत.
रेसिडंट वेलफेअर असोसिएशनने काय म्हटलं?
रेसिडंट वेलफअर असोसिएशनने त्यांची बाजू मांडत हे म्हटलं आहे की, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न हा मुख्यतः राज्य सरकारच्या संबंधित विभागांचा आणि नोएडा प्राधिकरणाचा विषय आहे. त्यांनी नोटीस बोर्ड, संकेतस्थळ आणि MyGate अॅपद्वारे रहिवाशांना सूचना दिल्याचा दावा केला. विविध कायद्यांनुसार भटक्या कुत्र्यांना संरक्षण असल्यामुळे कोणत्याही व्यवस्थापन समितीला त्यांना सोसायटीतून हटवण्याचा अधिकार नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
आयोगाने नेमकं काय म्हटलं आहे?
दरम्यान यानंतर आयोगानं नमूद केलं की, “निवासी परिसरात भटक्या कुत्र्यांचा धोका रोखणे, रहिवाशांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करणे तसेच सुरक्षित व स्वच्छ वातावरण राखणे ही प्राथमिक जबाबदारी रेसिडंट वेलफेअर असोसिशनचीची आहे. कारण देखभाल शुल्क गोळा करून अंतर्गत व्यवस्थापन आणि रहिवाशांच्या कल्याणाची जबाबदारी रेसिडंट वेलफेअर असोसिएशन (RWA) पार पाडते.” सर्व बाबींचा विचार केल्यानंतर आयोगाने निष्कर्ष काढला की, RWA रहिवाशांना सुरक्षित आणि योग्य देखभाल व सुरक्षा सेवा पुरवण्यात अपयशी ठरली. त्यानंतर आयोगाने चार वर्षांच्या मुलीवर भटक्या कुत्र्याने केलेल्या हल्ला प्रकरणात एक लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
