National Kabaddi Player Anushka Pal Murder Case: राष्ट्रीय स्तरावर कबड्डीपटू म्हणून नाव कमावलेल्या १७ वर्षीय अनुष्का पालची हत्या झाल्याची माहिती नुकतीच समोर आली. उत्तर प्रदेशमधील मेरठची रहिवासी असलेली अनुष्का सहा आठवड्यांपासून बेपत्ता होती. तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत नाल्यात आढळल्यानंतर तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्रेता असलेल्या आरोपीने केवळ ३,६०० रुपयांच्या उधारीसाठी अनुष्काचा निर्घृण खून केला.

मेरठ जिल्ह्यातील चिरोडी गावची रहिवासी अनुष्का १६ एप्रिल पासून बेपत्ता होती. ती एका खासगी शाळेत इयत्ता बारावीच्या वर्गात शिकत होती. गावात शिक्षण आणि कबड्डी प्रशिक्षणाच्या सुविधा नसल्यामुळे अनुष्काच्या कुटुंबाने तिला मेरठ शहरातील शोभापूर येथे शिक्षणासाठी पाठवले होते. येथेच एका भाड्याच्या घरात ती आणि तिचा लहान भाऊ अनमोल पाल राहत होते.

अग्निवीरचा अर्ज भरण्यासाठी पैसे घेतले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या घराजवळ श्याम धनक नावाच्या व्यक्तीचे खाद्यपदार्थांचे दुकान होते. अनुष्का नियमित त्याच्या दुकानावर जात असल्यामुळे त्यांच्यात ओळख झाली होती. श्याम धनककडून तिने ३,६०० रुपये घेतले होते. अनुष्काच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, अग्निवीर योजनेचा अर्ज भरण्यासाठी अनुष्काने धनककडून उसने पैसे घेतले होते.

मात्र पैसे वेळेत परत न दिल्यामुळे श्याम धनक संतापला होता. त्यातच अनुष्काने त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्याची धमकी दिल्यामुळे धनकने तिच्या डोक्यात विट मारली. ज्यात तिचा मृत्यू झाला. यानंतर धनकने तिचा मृतदेह गोणीत भरून तो जवळच्या नाल्यात फेकला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस अधीक्षक विनायक गोपाळ भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी धनक अनुष्काकडे वारंवार पैशांची मागणी करत होता. १५ एप्रिल रोजी रात्री धनकने अनुष्काला फोन करून दुकानाजवळ बोलवून घेतले आणि पुन्हा एकदा पैशांची मागणी केली. दोघांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर धनकने अनुष्काच्या डोक्यात विटेने प्रहार केला. यानंतर अनुष्काचा मृतदेह गोणीत भरून नाल्यात फेकल्यानंतर धनक चंदीगडला पळून गेला.

अनुष्काच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, १५ एप्रिल पासून आमची मुलगी बेपत्ता झाली. त्यादिवशी रात्री १० वाजता तिचा फोन आला होता आणि ती दुसऱ्या दिवशी घरी येणार असल्याचे तिने सांगितले. पण ती घरी आली नाही आणि तिचा फोनही बंद होता. त्यानंतर आम्ही मेरठमध्ये जाऊन शोधाशोध केली. पण तिचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर आम्ही पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.

सहा आठवड्यांच्या तपासानंतर धनक अटकेत

अनुष्काचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पोलिसांनी तिचे मित्र, प्रशिक्षक, शेजारी यांच्याशी संवाद साधला. त्यातून श्याम धनकचा उल्लेख समोर आला. मात्र तोही मेरठमधून फरार होता. यानंतर तांत्रिक निगराणी आणि मोबाइल फोन डेटाच्या माहितीवरुन धनक चंदीगडमध्ये असल्याचे कळले. मेरठमधून पळून गेल्यानंतर त्याने चंदीगडमध्ये खाद्यपदार्थ विक्रीचा स्टॉल टाकला होता.

पोलिसांनी धनकला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केल्यानंतर त्याच्या जबाबात विसंगती आढळून आली. त्याच्यावर दबाव टाकल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला. त्याच्या कबुली जबाबानुसार, अनुष्का त्याच्या स्टॉलवर अधूनमधून येत असे. त्याने तिला ३,६०० रुपये दिले होते. मात्र पैसे परत देण्यास उशीर झाल्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. या रागातून त्याने अनुष्काची हत्या केली.

कुजलेल्या मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार

मृतदेह संपूर्ण कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे अनुष्काच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला आहे. अनुष्काचे केस लहान होते आणि ती कधी जीन्स घालत नव्हती, असा दावा कुटुंबीयांनी केला. नाल्यात सापडलेल्या मृतदेहाचे केस लांब असून निळी जीन्स परिधान केलेली दिसत आहे.

पोलीस अधीक्षक विनायक भोसले यांनी म्हटले की, काही जणांनी अनुष्काच्या कुटुंबीयांची दिशाभूल केली होती. मात्र त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. मोबाइल फोन आणि इतर पुराव्याच्या आधारावर तो मृतदेह अनुष्काचाच असल्याचे तिच्या कुटुंबीयांना पटवून देण्यात आले.

उत्तम कबड्डीपटूचा दुर्दैवी अंत

अनुष्का एक उत्तम खेळाडू होती. तिने उत्तर प्रदेशचे नेतृत्व राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये केले होते. संसद क्रीडा महोत्सव आणि शांता क्रीडा महोत्सव सारख्या प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये तिने भाग घेतला होता. तिचे वडील नेमपाल यांनी म्हटले की, नुकतीच तिने गाझियाबाद आणि मेरठमधील स्पर्धा जिंकली होती. “तिचे खेळाप्रती असलेले प्रेम आणि त्यासाठी कष्ट घेण्याची तयारी पाहून आम्ही तिला मेरठला पाठवले होते. ती आमच्या गावाचे नाव पुढे नेईल. जागतिक स्तरावर नाव कमवेल, असे सर्वांनाच वाटत होते. पण तिच्या आयुष्याचा असा वाईट अंत होईल, याचा स्वप्नातही कुणी विचार केला नव्हता”, अशा शब्दात नेमपाल यांनी मुलगी गमावल्याचे दुःख व्यक्त केले.

श्याम धनक अट्टल गुन्हेगार

४२ वर्षीय श्याम धनक हा अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मेरठमध्येच त्याच्यावर हत्येचा आणखी एक आरोप दाखल होता. या आरोपात कारावास भोगल्यानंतर २०२४ साली त्याची जामिनावर सुटका झाली होती.