scorecardresearch

दिवसाला ५०० रूपये कमवणाऱ्या विक्रेत्याला ३६६ कोटींच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी नोटीस

उत्तर प्रदेशातल्या एका कपडे व्यापाऱ्याला ही नोटीस आली आहे जी आल्यानंतर त्याच्या पायाखालची वाळूच सरकली होती

money

उत्तर प्रदेशातल्या मुझ्झफरनगर या ठिकाणी कपडे विक्री करून दिवसाकाठी जेमतेम ५०० रूपये कमवणाऱ्या एका विक्रेत्याला ३६६ कोटींच्या जीएसटी घोटाळा प्रकरणी नोटीस बजावण्यात आली. या कपडे विक्रेत्याच्या घरी जेव्हा जीएसटी विभागाचे अधिकारी ३६६ कोटींच्या जीएसटी घोटाळ्याची नोटीस घेऊन आले तेव्हा या विक्रेत्याला धक्काच बसला. एजाज अहमद असं या कपडे विक्रेत्याचं नाव आहे. या प्रकरणी आपण आता जीएसटी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागणार असल्याचं त्याने सांगितलं. ही नोटीस आल्यानंतर एजाज अहमदच्या पायाखालची वाळू सरकली होती. आता तो या प्रकरणी न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी करतो आहे.

दोन वर्षांपूर्वी काय घडलं होतं?

एजाज अहमद याने दोन वर्षांपूर्वी जनसाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका गावात भंगार सामानाचं छोटं दुकान उघडलं होतं. त्यावेळी त्याने जीएसटी नंबर काढला होता. मात्र दिवसभर फारशी कमाई होत नसल्याने आणि तोटा होऊ लागल्याने त्याने भंगारचा व्यवसाय बंद केला आणि कपडे विक्री सुरू केली. त्यावेळी मी जीएसटी नंबर बंद करण्यास सांगितलं होतं. मात्र आता दोन वर्षांनी हे प्रकरण समोर आलं आहे असं एजाजने सांगितलं. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

३६६ कोटींच्या जीएसटी घोटाळ्याचं प्रकरण समोर आल्यावर आधी एजाज घाबरून गेला होता. मात्र त्याला हे सगळं प्रकरण समजल्यावर त्याने यामागे नेमकं कोण आहे हे शोधण्याची आणि त्यांना कठोर शिक्षा देण्याची विनंती केली आहे.

जीएसटी विभागाचे सहाय्यक आयुक्त शुक्ला यांनी काय म्हटलं आहे?

उत्तर प्रदेशच्या जीएसटी विभागाचे सहाय्यक आयुक्त एस. शुक्ला यांनी ३०० कोटींची बिलं वितरित झाली आहेत अशी माहिती दिली असून आम्ही या प्रकरणी कसोशीने तपास करत आहोत. काही संस्था आणि व्यक्तींवर आमची नजर आहे. काही लोक आणि संस्था वेगळाच जीएसटी क्रमांक वापरत आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे.एजाज अहमदचा जो सीए आहे आम्ही त्याची चौकशी करणार आहोत असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 22:06 IST
ताज्या बातम्या