Goa beach photography rules police: गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर विदेशी महिलांना टवाळखोरांकडून होणारा वाढता त्रास लक्षात घेता, पोलिसांकडून कठोर पावले उचलण्यात आली आहेत. पर्यटकांना फोटो किंवा सेल्फीसाठी त्रास दिल्यास अशा हुल्लडबाजांना आता पोलिसांकडून ताब्यात घेतले जाणार आहे. गोव्यात विदेशी अथवा देशी पर्यटकांचा आता परवानगीशिवाय फोटो किंवा सेल्फी काढता येणार नाही.

तामिळनाडूचे दोघेजण ताब्यात

गेल्या आठवड्यात उत्तर गोव्यातील बागा समुद्रकिनाऱ्यावर तामिळनाडूच्या काही पर्यटकांना विदेशी पर्यटकांनी फोटोसाठी त्रास दिला. विदेशी महिला पर्यटकांनी परवानगी दिली नसताना त्यांना फोटो, सेल्फीसाठी त्रास देण्यात आला. याघटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून याची गंभीर दखल घेण्यात आली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १७० अंतर्गत चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेतले.

समुद्रात आंघोळ करणाऱ्या विदेशी पर्यटक महिलेचा व्हिडिओ

कळंगुटमध्ये विदेशी पर्यटक महिला समुद्रात आंघोळ करत असताना तिचे चित्रीकरण केल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला होता. संशयित अलिस्टो लोबो याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद करुन त्याला ताब्यात घेतले होते. “संशयिताने पर्यटक महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. संशयिताने राज्यातील पर्यटनाला धक्का लावण्यासह, महिलेची बदनामी केली”, असे पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

संशयित लोबोच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ७९, ३५६ (२) अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. यापूर्वी रशियन पर्यटक महिलेला त्रास दिल्याप्रकरणी ओडिशाच्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

सोशल मीडियावर व्हिडिओ, फोटो व्हायरल

“गेल्या काही दिवसांत विदेशी पर्यटकांना त्रास दिला जात असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. समुद्रकिनाऱ्यांवर प्रामुख्याने महिलांना फोटो आणि व्हिडिओसाठी जबरदस्ती केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. पर्यटकांच्या परवानगीशिवाय फोटो अथवा व्हिडिओ काढल्यास संबंधिताला ताब्यात घेतले जाईल”, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला दिली आहे.

समुद्रकिनाऱ्यांवर पोलिसांची गस्त वाढली

दरम्यान, वाढत्या घटना लक्षात घेता पोलिसांनी समुद्रकिनाऱ्यावर गस्त घालण्याचे प्रमाण वाढवले आहे. पर्यटन हंगाम सुरु होताच उघडकीस आलेल्या या दोन घटनांमुळे राज्यातील महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये काही जणांना महिला पर्यटकांना त्रास दिल्याची घटना हरमल समुद्रकिनाऱ्यावर उघडकीस आली होती. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद करुन संशयितांना अटक केली होती. ऑक्टोबरमध्ये देखील अशाप्रकारची घटना उघडकीस आली होती.