बंगळूरु : मशिदींमध्ये भोंग्यांच्या बेकायदेशीर वापराविरुद्ध कर्नाटकातील काही हिंदू संघटनांनी सोमवारी मोहीम हाती घेतली. या संबंधात काँग्रेसच्या मुस्लीम नेत्यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेतल्यानंतर, भोंग्यांच्या वापराबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. पोलीस, गृह विभाग आणि कायदा मंत्रालय यांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत त्यांनी बैठकही घेतली.

यापूर्वी सोमवारी, मशिदींतील भोंग्याविरोधात कारवाई करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करून श्री राम सेनेसह हिंदू संघटनांनी चालवलेल्या मोहिमेचा भाग म्हणून राज्याच्या निरनिराळय़ा भागांतील मंदिरांमध्ये हनुमान चालीसा, सुप्रभात, ओंकार व भक्तिगीते वाजवण्यात आली. पहाटे ५ वाजताच्या सुमारास मशिदीतील भोंग्यांवरून ऐकू येणाऱ्या अजानला प्रत्युत्तर म्हणून, मंदिरात हजर असलेल्या लोकांनी ध्वनिमुद्रित गाणी किंवा भजने म्हटली.

बंगळूरु, हुबळी, बेळगाव, मैसुरू, चिक्कमंगळुरू, यादगीर, मंडय़ा व कोलार यांसह इतर ठिकाणी अशा घटना घडल्या. बंगळूरुसह काही ठिकाणी पोलिसांनी काही हिंदू कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

‘अजान मुद्दय़ाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे काही आदेश असून ते सर्वाना लागू आहेत. त्यांची सौहार्दपूर्ण वातावरणात अंमलबजावणी केली जायला हवी. इतर राज्यांत काय झाले आहे, ते आम्ही पाहिले आहे,’ असे बोम्मई म्हणाले. आमची मोहीम सरकारच्या आणि ‘हट्टी’ मुस्लीम समुदायाच्या विरोधात आहे, असे मैसुरूतील आंजनेय मंदिरातील पहाटेच्या प्रार्थनेत सहभागी झालेले श्री राम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी सांगितले. ‘भोंग्यांमुळे उद्भवणारे प्रश्न, समाजाला, विद्यार्थी व रुग्णांना होणारा त्रास याबाबत गेले वर्षभर आम्ही सतत इशारे देत आहोत; पण काहीही बदलले नाही, केवळ नोटिसा देण्याशिवाय काही कारवाई करण्यात आली नाही. आजही पहाटे ५ वाजता भोंगे वाजवणे मशिदींनी थांबवलेले नाही,’ असे ते म्हणाले.