पीटीआय, वॉशिंग्टन : ‘अमेरिकेच्या प्रतिनिधी गृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पलोसी यांच्या तैवान दौऱ्यानंतर बिथरलेल्या चीनने जो लष्करी सरावाचा भीतिदायक आणि शक्तिप्रदर्शनाचा प्रयोग केला, तो मूलत: शांतता आणि स्थैर्यविरोधी आहे. अमेरिका मात्र तैवानच्या समर्थनासाठी शांतपणे दृढ पावले उचलणार आहे,’ असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या व्हाईट हाऊसस्थित कार्यालयाकडून शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चीनचा सत्तारूढ साम्यवादी पक्ष दीर्घकाळापासून तैवानवर आपला हक्क असल्याचा दावा करत आहे. चीनचे विद्यमान ‘एक चीन धोरण’ परदेशी उच्चपदस्थांना तैवानचा परस्पर दौरा करण्यास प्रतिबंध करते. पलोसी यांच्या तैवान दौऱ्यानंतर चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने ४ ते ७ ऑगस्टपर्यंत लष्करी सराव केला. त्यानंतर चीनने तैवानच्या परिसरात लष्करी सराव वाढवून सागरी क्षेत्रात क्षेपणास्त्रेही डागली. तैवान हा आपला एक विद्रोही प्रांत असल्याचे चीनचे म्हणणे आहे. त्याला चीनच्या मुख्य भूमीत सामील करून घेतले पाहिजे, असे चीनचे म्हणणे आहे. ‘एक चीन धोरण’ सिद्धांत लागू करण्यासाठी तैवानमध्ये नियमित लष्करी सराव नियमितपणे आयोजित करण्यात येईल, असा इशारा चीनने बुधवारी दिला होता.

या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांचे भारत-प्रशांत महासागरीय प्रदेशाचे समन्वयक कर्ट कँपबेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की चीनची ही कारवाई या प्रदेशातील शांतता व स्थिरता भंग करणारी आहे. तैवानवर प्रचंड दबाव आणण्याचा हा एक भाग आहे. जो अजून संपलेला नाही. आगामी काही आठवडे किंवा महिने चीनतर्फे असे आक्रमक लष्करी सराव केले जातील, असा आमचा कयास आहे. तैवानला धाकदपटशा दाखवून, हतबल करण्याचा चीनचा हेतू आहे. मात्र, अमेरिका तैवानला कमजोर करण्याच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर तैवानला दृढ  पाठिंबा देऊन या परिसरात शांतता व स्थैर्यासाठी खंबीर पावले टाकत राहणार आहे. चीनला यासंदर्भातील प्रयत्न निष्प्रभ करण्यासाठी अमेरिका सर्वतोपरी प्रयत्न करेल. येत्या काही आठवडय़ांत-महिन्यांत अनेक क्षेत्रांत अमेरिका या दिशेने पावले उचलताना दिसेल. हे आव्हान दीर्घकालीन असल्याने आम्ही झुकणारे लवचिक धोरण अवलंबणार नाही, अथवा गुडघे टेकणार नाही. उलट आम्ही प्रभावीपणे धारिष्टय़ाने पावले उचलू.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Strong us support for taiwan role face china threats ysh
First published on: 14-08-2022 at 00:55 IST