नवी दिल्ली : जंतर-मंतरवर महिनाभर सुरू असलेल्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करणार्‍या केंद्र सरकारच्या विरोधातील तरुणांच्या संयमाचा सोमवारी कडेलोट झाला. शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकारांविरोधात सोमवारी हजारो तरुण-तरुणी पोलीस आणि निमलष्करी दलाचे बहुस्तरीय सुरक्षाकवच मोडून संसदेवर धडकले.

पावसाळी अधिवेशनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून तमाम मंत्री, खासदार संसदेत उपस्थित असताना आंदोलकांचे लोंढेच्या लोंढे संसदेच्या मुख्य द्वारावर येऊन दाखल झाल्याने सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे स्पष्ट झाले. सुरक्षा जवानांनी केलेला लाठीमार आणि अश्रुधुराचा माराही संतप्त तरुण वर्गाला थोपवू शकला नाही. त्यामुळे सोमवारी दिवसभर राजधानी दिल्ली तणावाखाली राहिली.

‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलकांनी जंतर-मंतरवर ठिय्या दिला होता. कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी-तरुण म्हणजेच ‘जेन झी’ सहभागी झाले होते. केंद्र  सरकारने त्यांच्या मागण्यांची दखल न घेतल्याने ‘सीजेपी’ने सोमवारी संसदेवर मोर्चा काढण्याचे आवाहन केले होते. या मोर्चात सहभागी होत दुपारी बाराच्या सुमारास संसदेसमोरील रायसीना रोडवरून हजारो आंदोलकांचा जथा घोषणाबाजी करत अवघ्या काही मिनिटांत संसदेच्या प्रवेशद्वारावर पोहोचला.

इतक्या मोठ्या संख्येने आंदोलक संसदेपर्यंत येऊन पोहोचतील याचा अंदाज संसदेतील ‘सीआयएसएफ’च्या सुरक्षा व्यवस्थेला आणि संसदेच्या बाहेर तैनात शीघ्रकृती दलाच्या जवानांना नव्हता. समोरच्या चौकातील अडथळे-नाकाबंदी तोडून हे आंदोलक संसदेच्या प्रवेशद्वारावर पोहोचले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा सोमवारी पहिला दिवस होता व अधिवेशनाच्या काळात इथे आधीपासून कडेकोट बंदोबस्त ठेवला जातो. दिल्ली पोलीस, सीआरपीएफ व इतर निमलष्करी जवान तैनात असतात. ही बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था व बंदोबस्त असूनदेखील आंदोलकांनी सुरक्षाकडे तोडले कसे, असा प्रश्न विचारला जात आहे. संसद परिसरातील सुरक्षा व्यवस्थेमध्ये मोठा गलथानपणा झाल्याचे स्पष्ट झाले. तीन दिवसांपूर्वीच दिल्लीचे पोलीस आयुक्त बदलण्यात आले होते हे विशेष!

‘सीजेपी’चा मुख्य मोर्चा जंतर-मंतरवरून संसद मार्गाने संसदेकडे कूच करणार होता. या संपूर्ण मार्गावर दिल्ली पोलीस व निमलष्करी दलाचे सुमारे आठ हजार जवान तैनात केले होते. संसद मार्ग पोलीस ठाण्याच्या आधी, मध्ये आणि पलीकडे अशा तीन स्तरांमध्ये बॅरिकेड लावून सुरक्षेचे तीन स्तर तयार करण्यात आले होते. तिसर्‍या स्तराच्या पलीकडे आंदोलकांचा जनसागर लोटला होता. जंतर-मंतरच्या मागील बाजूही बंद करण्यात आली होती. त्यामुळे आंदोलक संसद मार्गावर एकत्र आले.

‘सीजेपी’चे प्रवक्ते सौरभ दास व अन्य नेते सकाळी सुमारे १० च्या सुमारास संसद मार्ग पोलिस ठाण्यात चर्चेसाठी गेले होते. तोपर्यंत आंदोलक संसदेकडे जाणाच्या तयारीत होते. काही वेळानंतर आंदोलक आक्रमक झाले आणि पोलिसांनी अडवल्यामुळे अस्वस्थही झाले होते. सुमारे तासभरानंतर परतलेल्या दास यांनी आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. केंद्र सरकारने संपर्क केला असून त्यांच्याशी चर्चा होऊ शकते, असे दास आंदोलकांना पटवून देत होते. मात्र, आंदोलकांची सहनशक्ती संपल्याने तिसर्‍या स्तरातील बॅरिकेड तोडून आंदोलक घुसले. संसद मार्गावर हालकल्लोळ माजला. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्यामुळे अनेक आंदोलक जखमी झाले. काही जबर जखमी झाले. तरीही आंदोलकांची आक्रमकता कमी न झाल्याने पोलिसांनी पुन्हा लाठीमार केला.

इंटरनेट सेवा बंद

‘सीजेपी’चे आंदोलन हिंसक झाल्यानंतर संसद परिसरापासून चार-पाच किमी अंतरातील मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. संसदेपासून साडेतीन किमीवर असलेल्या महाराष्ट्र सदनामध्येही मोबाइल इंटरनेटची सेवा मिळत नव्हती. संध्याकाळी सहानंतर इंटरनेट सेवा पूर्ववत झाली. 

१०० जखमी; १०० ताब्यात

जमावाला रोखण्यासाठी सुरक्षा दलांनी लाठीमार केल्याच्या अनेक चित्रफिती दिवसभर फिरत होत्या. आंदोलकांनी दगडफेक केल्याचेही वृत्त आहे. दिवसभरात ५० हून अधिक पोलीस आणि तितकेच आंदोलक जखमी झाल्याचे सांगण्यात आले. आंदोलनादरम्यान १०० हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची ओळख पडताळणी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

‘तथ्य मजबूत असेल तर गोंधळाची गरज नाही’

नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन रचनात्मक असावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले. तथ्ये असतील तर गोंधळ करण्याची गरज नसते. तुमचे तर्क आणि तथ्ये मजबूत असतील तर तुम्हाला आवाज मोठा करण्याची गरज नाही असे पंतप्रधानांनी नमूद केले.

नरेंद्र मोदी हे देशाच्या इतिहासातील सर्वाधिक युवा-विरोधी पंतप्रधान आहेत. केंद्र सरकार केवळ युवकांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले नाही तर ते त्यांच्यावरच हल्ला करत आहे. – राहुल गांधी,  विरोधी पक्षनेते