पंजाब येथील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या वसतिगृहात एका विद्यार्थिनीवर बलात्कार करण्यात आल्याची अफवा पसरली आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाले. या विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं तसंच विद्यापीठातही तोडफोड आणि जाळपोळ केली. या प्रकरणाची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. पोलिसांनी अज्ञातांविरोधात FIR दाखल केली आहे. दरम्यान पोलीस आयुक्त सतिंदर सिंग यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देत वातावरण शांत आहे असं सांगितलं आहे अफवांवर विश्वास ठेवू नका असंही आवाहन केलं आहे.
पोलीस आयुक्त सतिंदर सिंग काय म्हणाले?
LPU अर्थात लव्हली प्रोफेशन युनिव्हर्सिटीच्या विद्यापीठातील हॉस्टेलमध्ये काही गैरप्रकार झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण त्या सगळ्या अफवा होत्या. सगळ्या वसतिगृहांमध्ये तपासणी करण्यात आली आहे. आता वाहतूक कोंडीही सुटली आहे. तसंच विद्यार्थ्यांशी आम्ही चर्चा करून पुढचा प्रश्नही सोडवू. इथल्या मुलांनीही आम्हाला मदत केली. आता वाहतूक खुली करण्यात आली आहे. मी मुलांच्या आई वडिलांनाही हे सांगू इच्छितो की इथलं वातावरण व्यवस्थित आहे. त्यांनी कुठल्याही गोष्टींवर, अफवांवर विश्वास ठेवू नये.
नेमकी अफवा काय पसरली होती ज्यामुळे आंदोलन पेटलं?
लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये शनिवारी रात्री एका मुलीवर बलात्कार झाला आणि त्यानंतर तिने आत्महत्या केली अशी एकअफवा पसरली. मात्र अशी कुठलीही घटना या ठिकाणी घडलेली नाही. एवढंच नाही तर या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींचंही हेच म्हणणं आहे की या विद्यापीठाच्या वसतिगृहात असं काहीही घडलेलं नाही. एका विद्यार्थिनीने असं सांगितलं की सकाळी पोलीस आमच्या रूमच्या बाहेर आले, त्यांनी दरवाजा वाजवला. त्यांनी आम्हाला विचारलं की अशी काही घटना घडली आहे का तुम्ही काही ऐकलं आहे का? ज्यावर आम्हीही त्यांना असं काही घडलेलं नाही हे सांगितलं.
रुम नंबर ५०४ मध्ये राहणाऱ्या मुलींनी नेमकं काय सांगितलं?
आम्ही रुम नंबर ५०४ मध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनी आहोत. आमच्या रूममध्ये काहीही घडलेलं नाही. विद्यार्थी आणि पोलीस यांनी येऊन आम्हाला त्रास देऊ नये. आम्हाला उगाच त्रास दिला जातो आहे आम्हाला आता आमच्या आई वडिलांना या ठिकाणी बोलवावं लागेल. आम्ही तुम्हाला विनंती करतो की वारंवार आमच्या रूममध्ये येऊन आम्हाला त्रास देऊ नका. अशी आमची हात जोडून विनंती आहे. असं लव्हली युनिव्हर्सिटीतल्या रुम नंबर ५०४ मध्ये राहणाऱ्या मुलींनी सांगितलं आहे.
अफवेचे पडसाद रविवारी कसे उमटले?
शनिवारी ही अफवा पसरली आणि रविवारी त्याचे पडसाद उमटले. विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले होते. या विद्यार्थ्यांनी जोरदार हंगामा केला आणि तोडफोडही केली. विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. दुकानं आणि सार्वजनिक मालमत्ताही यांचंही त्यांनी नुकसान केलं. पोलिसांच्या गाड्यांना आग लावली गेली. पोलीसांवर या विद्यार्थी आंदोलकांनी दगडफेकही केली. समोर आलेल्या माहितीनुसार जो हिंसाचार आंदोलनाच्या दरम्यान झाला त्यात काही कोटींचं नुकसान झालं आहे. परिस्थिती चिघळल्यानंतर पंजाब पोलिसांनी विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात केले. तसंच रात्री उशिरा फ्लॅग मार्चही काढण्यात आला. ज्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांचं आंदोलन मागे घेतलं. सध्या या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आहे असं सांगण्यात आलं आहे.
