गेल्या वर्षी २३ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच करोनाच्या भितीमुळे लॉकडाऊन लागू केला होता. तेव्हापासून देशातल्या सर्वच भागातल्या शाळा बंद होत्या. त्यानंतर तब्बल ८ महिन्यांनी करोनावर प्रभावी ठरेल अशी सिरम इन्स्टिट्युटची व्हॅक्सिन बाजारात आली. हळूहळू लॉकडाऊनकडून अनलॉकचा प्रवास देखील सुरू झाला. इतर सर्व आस्थापनांसोबतच करोना काळात बंद असलेल्या शाळा देखील टप्प्याटप्प्याने उघडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये शाळा सुरू होऊ लागल्या आहेत. मात्र, एकीकडे महाराष्ट्रात शाळा पूर्णपणे सुरू कराव्यात किंवा न कराव्यात, यावर मोठी चर्चा सुरू असताना दुसरीकडे पंजाबमध्ये करोना काळानंतर शाळा सुरू होताच १५ विद्यार्थी आणि त्यांच्यासोबत २ कर्मचारी देखील करोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घावा लागला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२ मार्चपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय

लुधियानाच्या चौंटा भागामध्ये ७ जानेवारीपासून शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. ५वी ते १२वी अशा ८ वर्गांसाठी या शाळा सुरू झाल्या. मात्र, १६ फेब्रुवारी रोजी शासकीय उच्च माध्यमिक शाळेत १५ विद्यार्थी आणि त्यांच्यासोबत २ शालेय कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळले. लुधियानाच्या उपायुक्तांनी तातडीने ही शाळा २ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले. तसेच, सर्व बाधित विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.

शाळा सुरू कराव्यात की नाही?

जवळपास १० महिने बंद राहिल्यानंतर ७ जानेवारीपासून पंजाबमध्ये शाळा सुरू झाल्या होत्या. तसेच, पहिली आणि दुसरीचे वर्ग देखील फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्यात आले होते. पंजाबमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये करोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा खाली आला असून सध्या पंजाबमध्ये २ हजार ३५७ करोनाबाधित उरले आहेत. त्यामुळेच शाळा देखील सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
दरम्यान, शाळा सुरू झाल्यानंतर तिथे विद्यार्थी करोना पॉझिटिव्ह सापडण्याच्या अनेक घटना देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आढळून आल्या आहेत. त्यामुळे, इतक्यात शाळा पुन्हा सुरू कराव्यात किंवा नाही? यावर चर्चा सुरू झाली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Students found corona positive after schools reopen in covid 19 pandemic pmw
First published on: 17-02-2021 at 10:42 IST