देशात करोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र डेल्टा व्हेरिएंटचं संकट कायम असल्याने प्रशासन सज्ज आहे. असं असताना एका अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोविशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या १६.१ टक्के लोकांमध्ये करोनाच्या डेल्टा व्हेरिएंटच्या अँटिबॉडी आढळल्या नाहीत. ज्या लोकांनी कोविशिल्ड लसीचा एक डोस घेतला आहे. अशा ५८.१ टक्के लोकांच्या चाचण्यांमध्ये अँटिबॉडी दिसल्या नाहीत. त्यामुळे भारतातील काही लोकांना कोविशिल्ड लसीचा अतिरिक्त बूस्टर घ्यावा लागेल, असे संकेत अभ्यासातून मिळत आहेत. करोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे देशात लसीकरणावर जोर देण्यात आला आहे. देशात सध्या कोविशिल्ड. कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक व्ही लस देण्यात येत आहे.

“कोविशिल्डची लस घेतलल्यांमध्ये अँटिबॉडी तयार झाल्या असतील. मात्र त्याचं प्रमाण तुलनेनं कमी असेल. त्यामुळे त्या डिटेक्ट झाल्या नसतील. करोनापासून बचाव होईल इतक्या अँटिबॉडीज त्यांच्या शरीरात असतील. अँटिबॉडी आढळून न येणं आणि अँटिबॉडी तयार होणं या दोन्ही बाबी वेगळ्या आहेत”, असं वेल्लोरस्थित ख्रिश्चियन वैद्यकीय महाविद्यालयाच्या मायक्रोबॉयोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. जेकब जॉन यांनी हिंदुस्तान टाईम्सला सांगितलं.

“ऑक्सिजन तुटवड्यामुळे मी ७ दिवस झोपू शकलो नाही”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितला ‘तो’ अनुभव!

देशात व्यापक लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. १८ वर्षांपासून पुढच्या सर्व वयोगटातल्या व्यक्तींना सध्या मोफत लसीकरण सुरू आहे. त्यामुळे एकीकडे लसीकरणाचा वेग वाढत असताना दुसरीकडे रोज आढळणाऱ्या नव्या करोनाबाधितांच्या संख्येत सलग चौथ्या दिवशी घट दिसून आली. गुरुवारी १ जुलै रोजी ४८ हजार ७८६ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. २ जुलै रोजी हा आकडा ४६ हजार ६१७ नोंदवण्यात आला होता. ३ जुलै रोजी ही संख्या ४४ हजार १११ इतकी खाली आल्यानंतर आज चौथ्या दिवशी ४३ हजार ०७१ इतक्या नव्या करोनाबाधितांचा आकडा नोंदवण्यात आला आहे. गेल्या २४ तासांमधली ही आकडेवारी असून रुग्णसंख्या हळूहळू घटत असल्याचं यावरून दिसून येत आहे.