Karnataka MLAs Australia New Zealand tour controversy: कर्नाटकातील १५ आमदार १६ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला जाणार आहेत. आमदारांच्या या प्रस्तावित दौऱ्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. जनतेच्या पैशातून होणारा हा दौरा अनावश्यक आणि खर्चिक असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.

अधिकृत सरकारी दौरा नाही

आमदारांच्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर सर्व स्तरातून टीका होऊ लागल्यानंतर सरकारकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. “आमदारांचा दौरा अधिकृत सरकारी दौरा नाही आणि त्यासाठी कोणत्याही सार्वजनिक निधीचा वापर केला जात नाही. आमदार स्वतःच सर्व खर्च उचलणार आहेत”, असे सरकारी सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या दौऱ्यासाठी राज्याच्या तिजोरीवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.

सचिवांना विनंती पत्र

दौऱ्यासाठी रिसतर परवानगी मागणाऱ्या आमदारांमध्ये चिकमंगळूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार एच. डी. थम्मैया यांचा समावेश आहे. थम्मैया यांनी सचिवांना लिहलेल्या पत्रात त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला जाण्याचा उल्लेख केला आहे. यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) व रजा परवानगी पत्र मिळण्यास सुलभता यावी यासाठी आवश्यक सूचना जारी करण्याची विनंती केली आहे.

पशुसंवर्धन विभागातर्फे दौऱ्याचे आयोजन

समोर आलेल्या अधिकच्या माहितीनुसार, राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने या दौऱ्याचे आयोजन केले जात आहे. पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित कार्यपद्धतीचा अभ्यास करणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. परदेशातील यशस्वी मॉडेल्सचा उपयोग आपल्या देशात सुधारणांसाठी कसा करता येईल? यावर लक्ष केंद्रित केले जाईल, अशी माहिती समोर आली आहे.

जनतेच्या पैशाची उधळपट्टी, विरोधकांचा आरोप

आमदारांच्या या दौऱ्यावर विरोधी पक्षातील नेत्यांनी जोरदार टीका केली असून, हा दौरा म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे, असा आरोप केला आहे. पण, सरकारकडून हा दौरा आमदार स्वखर्चाने करत असल्याने सरकारी निधीतून होणाऱ्या परदेश दौऱ्यासारखा मानला जाऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.