इंदिरा गांधी यांनी १९७७ साली घेतलेल्या काही गुप्त निर्णयांची माहिती सुब्रमण्यम स्वामी यांनी अमेरिकेला पुरविल्याचा आरोप विकिलीक्सने केला आहे. १९७७ सालातील एका इलेक्ट्रॉनिक टेलिग्रामचा दाखला देत विकिलीक्सने हा आरोप केला आहे. इंदिरा गांधी यांनी निवडणुकांसंदर्भात घेतलेल्या काही गुप्त निर्णयांची माहिती अमेरिकेला राज्यसभेचे माजी खासदार असणाऱ्या सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्याचे विकिलीक्सतर्फे सांगण्यात आले आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे  इंदिरा गांधी यांनी १९७७ साली मार्च महिन्यात निवडणुका घेण्याचे ठरविले असल्याची माहिती अमेरिकन खात्याला इलेक्ट्रॉनिक टेलिग्रामद्वारे देण्यात आली होती. प्रकृती अस्वास्थ्यामुळे इंदिरा गांधींनी भविष्यातील अडचणी टाळण्याच्या दृष्टीने १९७७ सालच्या मार्च महिन्यात निवडणुका घेण्याचे ठरविल्याची माहिती सुब्रमण्यम स्वामी यांनी एका अमेरिकन अधिका-याला दिल्याचा दावा विकिलीक्सने केला आहे. या लोकसभा निवडणुकांत स्वत: इंदिरा गांधी रायबरेली मतदारसंघातून पराभूत झाल्या होत्या आणि काँग्रेस पक्षालासुद्धा मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र, या निवडणुकीत सुब्रमण्य स्वामी लोकसभेवर निवडून गेले होते.