UPSC CSE Anuj Agnihotri: शुक्रवारी (६ मार्च) जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत अनुज अग्निहोत्री देशात प्रथम आला. वयाच्या २५ व्या वर्षी अनुजने हे यश मिळवले आहे. “माझी आई नेहमीच लोकांची सेवा करण्यासाठी आणि आपल्या परिसरात बदल घडवून आणण्यासाठी माझी प्रेरणा राहिली आहे,” असे अनुजने यशानंतर सांगितले. ‘यूपीएससी’ने शुक्रवारी नागरी सेवा परीक्षा २०२५ चा निकाल जाहीर केला, ज्यामध्ये अनुज अग्निहोत्रीने ऑल इंडिया रँक १ मिळवला.
पहिल्या प्रयत्नात यूटीसीएस
जोधपूर येथील एम्समधून एमबीबीएस केलेल्या अनुजने २०२३ मध्ये पहिल्याच प्रयत्नात केंद्रशासित प्रदेश नागरी सेवा (यूटीसीएस) परीक्षा उत्तीर्ण केली. सध्या तो दिल्लीत एसडीएम म्हणून प्रोबेशन कालावधीत कार्यरत आहे. अनुजने आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या क्षणांची आठवण सांगताना म्हटले की, सुरुवातीला त्याला आयुष्यातील नेमके ध्येय स्पष्ट नव्हते, मात्र व्यापक दृष्टीकोन स्पष्ट होता. “सुरुवातीला मला माझ्या आयुष्यातील ध्येयाबद्दल पूर्ण स्पष्टता नव्हती. पण मला खात्री होती की मला लोकांची सेवा करायची आहे आणि माझ्या कामामुळे समाजाच्या मोठ्या घटकावर सकारात्मक प्रभाव पडावा,” असेही तो म्हणाला.
आनंदाने जवळपास अर्धा तास रडलो
आपल्या प्रवासाचा आढावा घेताना तो म्हणाला की, त्याने २०१७ मध्ये एमबीबीएस पदवीचे शिक्षण सुरू केले. त्या काळात मला जाणवले की एखाद्या व्यक्तीला बदल घडवून आणण्यासाठी काही प्रमाणात अधिकार आणि शक्तीही आवश्यक असते. त्यामुळे मी माझ्या पालकांशी चर्चा करून नागरी सेवांसाठी तयारी सुरू केली. ज्या दिवशी मी यूटीसीएस परीक्षा उत्तीर्ण झालो, त्या दिवशी मला स्वतःवर विश्वासच बसत नव्हता. मी स्वतःला माझ्या खोलीत बंद केले आणि आनंदाने जवळपास अर्धा तास रडलो.
कोचिंगविना अभ्यास
प्रशिक्षण कालावधीत असतानाही अनुजने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तयारी सुरूच ठेवली. हा त्याचा तिसरा प्रयत्न होता. त्याने कोणत्याही कोचिंग सेंटरची मदत घेतली नाही. ही संपूर्ण कामगिरी त्याच्या स्वतःच्या मेहनत आणि समर्पणाचे फलित आहे. तो दररोज सुमारे १३ तास अभ्यास करत असे. “आज आम्हाला आमच्या मुलाचा प्रचंड अभिमान वाटतो. मला खात्री आहे की तो देशातील सर्वोत्तम आयएएस अधिकाऱ्यांपैकी एक बनेल,” असे अनुजचे वडील कृष्णा बिहारी यांनी सांगितले. ते राजस्थान अणुऊर्जा केंद्रात तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.
