पीटीआय, लंडन

ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी इच्छुक माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांना उमेदवारीच्या रिंगणात उतरण्यासाठी सत्ताधारी काँन्झव्र्हेटिव्ह पक्षाच्या किमान शंभर ‘पार्लमेंट’ सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. तेवढी आवश्यक सदस्यसंख्या त्यांनी गाठली असल्याचा दावा सुनक यांच्या समर्थकांनी शनिवारी केला.

४२ वर्षीय सुनक यांना या पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. त्यासाठी त्यांनी हालचाली सुरू केल्या असून, त्यांना पाठिंबा देणाऱ्या ‘पार्लमेंट’ सदस्यांची संख्या वाढत चालली आहे. दरम्यान, माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन हेही कॅरेबियन बेटांवर सुटी व्यतीत करून परतले आहेत. सुनक किंवा जॉन्सन या दोघांनीही पंतप्रधानपदासाठीची ही पक्षांतर्गत निवडणूक लढवण्याचे अद्याप अधिकृतरित्या घोषित केलेले नाही. ‘हाउस ऑफ कॉमन्स’च्या नेत्या पेनी मॉर्डाट यांनी मात्र पंतप्रधानपदासाठी आपली उमेदवारी जाहीर केली आहे.

तथापि, काँन्झव्र्हेटिव्ह पक्षाचे काही प्रभावशाली मंत्री आणि पार्लमेंट सदस्यांनी सुनक यांच्या पारडय़ात आपले वजन टाकल्याने त्यांनी या शर्यतीत सहज आघाडी घेतल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यांना सट्टेबाजांचीही वाढती पसंती आहे. माजी उपपंतप्रधान डॉमिनिक राब यांनी ‘बीबीसी’ला सांगितले, की सुनक यांची या पदासाठी निवड सर्वार्थाने योग्य ठरेल. अर्थव्यवस्थेला स्थैर्य प्रदान करण्यासाठी, देशातील कोटय़वधी कामगार व उद्योग-व्यवसायांसाठी आश्वासक वातावरण निर्माण करण्यासाठी पंतप्रधानपदाचे ते सर्वोत्तम उमेदवार आहेत.

राब यांनी वादग्रस्त बोरिस जॉन्सन यांच्या पंतप्रधानपदी पुन्हा निवडीस विरोध दर्शवताना सांगितले, की राजीनामा देण्यास भाग पाडल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांतच त्यांची पुनर्निवड योग्य ठरणार नाही. टाळेबंदीच्या काळात नियमबाह्य पार्टी घेऊन जॉन्सन यांनी सदस्यांची दिशाभूल केली अथवा नाही, याची पार्लमेंटर्फे चौकशी सुरू आहे. आपण मागे जाऊन पुन्हा विविध गैरप्रकारांची पुनरावृत्ती करू शकत नाही. हा देश आणि सरकारची पावले सदैव पुढेच पडली पाहिजेत.

सुनक-जॉन्सन तडजोडीची शक्यता
लंडनला परतणाऱ्या विमानातील बोरिस जॉन्सन यांचे सहकुटुंब छायाचित्र ‘स्काय न्यूज’ने प्रसिद्ध केले. त्यामुळे जॉन्सन पंतप्रधानपदी पुनरागमन करण्यास इच्छुक असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यांना पुनरागमनासाठी जाहीर पाठिंबा देणाऱ्या पार्लमेंट सदस्यांची संख्या ४५ वर गेली आहे. परंतु त्यांच्या निष्ठावंतांना खात्री आहे, की सोमवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी दोनपर्यंतच्या अंतिम मुदतीपर्यंत ते १०० सदस्यांचा पाठिंबा मिळवण्यात निश्चित यशस्वी होतील. सोमवारी रिंगणात एकच उमेदवार असल्याचे स्पष्ट झाल्यास पुढील आठवडय़ात शुक्रवारी इतर पक्षसदस्यांनी करावयाचे ‘ऑनलाइन’ मतदान घेण्याची गरजच उरणार नाही. दरम्यान, सुनक आणि जॉन्सन यांच्यात समझोता होण्याची शक्यता दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांद्वारे व्यक्त होत आहे.