नवी दिल्ली : देशातील साखर कारखान्यांनी अतिरिक्त साखरेच्या समस्येवर मात करण्यासाठी इथेनॉल, सीएनजी, सीबीजी आणि ग्रीन हायड्रोजनसारख्या अन्य उत्पादनांच्या पर्यायांकडे वळले पाहिजे, तसेच कारखान्यांचे आधुनिकीकरण केले पाहिजे, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात केली.राज्यातील सहकारी साखर कारखान्यांचा २०१६ पासूनचा प्राप्तिकर रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे पवार यांनी स्वागत केले. हा निर्णय १९९२-९३ पासून लागू करणे गरजेचे असल्याचे पवार म्हणाले. ‘एफआरपी’पेक्षा जास्त दर दिलेल्या साखर कारखान्यांनी नफा कमावल्याचे मानून त्यांना प्राप्तिकर खात्याने नोटिसा बजावल्या होत्या. या नोटिसा मागे घेण्यात आल्या असून कारखान्यांना प्राप्तिकरातूनही वगळण्यात आले आहे.

देशात विक्रमी ऊस उत्पादन झाले असून उसाखालील क्षेत्र ५५ लाख हेक्टपर्यंत वाढले आहे. प्रति हेक्टर उत्पादन ८५ टनांपर्यंत गेले असून साखरेचा उतारा सरासरी ११ टक्कय़ांवर पोहोचला आहे. त्यामुळे साखरेचे उत्पादन ३०० लाख टनांवर पोहोचले असून देशांतर्गत मागणी २६०-२७२ लाख टन आहे. त्यामुळे अतिरिक्त साखरेच्या समस्येवर उपाय शोधण्याची गरज आहे, त्यासाठी साखरेतर उत्पादनांच्या निर्मितीवर साखर कारखान्यांनी लक्ष केंद्रित  करावे, असेही पवार म्हणाले.    

महासंघाच्या वतीने ४० गुणवत्ता पुरस्कार विविध राज्यांतील सहकारी साखर कारखान्यांना देण्यात आले. या पुरस्कार वितरण कार्यक्रमाला केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे आदी उपस्थित होते.

२०१९-२० चे पुरस्कार

० वसंतदादा पाटील राष्ट्रीय पुरस्कार: भीमाशंकर सह. साखर कारखाना, आंबेगाव, पुणे</p>

०ऊस विकास-उपादकता: पतंगराव कदम सोनहिरा कारखाना, कडेगाव (सांगली) व अजिंक्यतारा कारखाना, शेंद्रे (सातारा)

० तांत्रिक दक्षता: विघ्नहर कारखाना, जुन्नर (पुणे) व क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड कारखाना, पळूस (सांगली)

० आर्थिक व्यवस्थापन: द्वितीय पुरस्कार कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ कारखाना, अंबड (जालना)

० विक्रमी साखर उतारा: कुंभी-केसरी कारखाना, करवीर (कोल्हापूर)

० विक्रमी ऊस गाळप: जवाहरलाल शेतकरी कारखाना, हातकणंगले (कोल्हापूर) व सह्याद्री कारखाना, कराड</p>

२०२०-२१ चे पुरस्कार

० वसंतदादा पाटील राष्ट्रीय पुरस्कार: पांडुरंग कारखाना, माळशिरस (सोलापूर)

० सर्वोत्कृष्ट सह. साखर कारखाना: छ. शाहू कारखाना, कागल (कोल्हापूर)

० ऊस विकास-उपादकता: श्री दत्ता कारखाना, शिरोळा (कोल्हापूर) व राजारामबापू पाटील कारखाना, वाळवा (सांगली)

० तांत्रिक दक्षता: विघ्नहर कारखाना, जुन्नर (पुणे) व पतंगराव कदम सोनहिरा कारखाना, कडेगाव (सांगली)

० विक्रमी साखर उतारा: अजिंक्यतारा कारखाना, शेंद्रे (सातारा)

० विक्रमी ऊस गाळप: जवाहर शेतकरी कारखाना, हातकणंगले (कोल्हापूर)

० विक्रमी साखर निर्यात: विठ्ठलराव शिंदे कारखाना, माढा (सोलापूर) व सह्याद्री कारखाना, कराड (सातारा)