१९० हून अधिक जखमी
वायव्य पाकिस्तानमधील पेशावर शहरात शुक्रवारी एका शिया मशिदीत नमाजादरम्यान झालेल्या बॉम्बस्फोटात किमान ५६ जण ठार, तर १९० हून अधिक जण जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. किसा ख्वानी बाजार भागातील जामिया मशिदीत हा स्फोट झाला. तेथे शुक्रवारच्या नमाजासाठी मोठय़ा संख्येने लोक जमले होते. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही.
लेडी रीडिंग रुग्णालयाचे माध्यम व्यवस्थापक असीम खान यांनी सांगितले की, स्फोटात ठार झालेल्या ३० जणांचे मृतदेह दुपापर्यंत रुग्णालयात आणण्यात आले होते, असे वृत्त डॉनने दिले आहे. जखमींपैकी १० जणांची प्रकृती गंभीर आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. कॅपिटल सिटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन हल्लेखोरांनी मशिदीत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मशिदीच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या पोलिसांवर गोळीबार केला. यात एक पोलीस ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. गोळीबारानंतर स्फोट झाला.
स्थानिक पोलिस अधिकारी वाहीद खान यांनी सांगितले, की पेशावरच्या जुन्या भागातील कुचा रिसालदार मशिदीत हा स्फोट झाला. अरुंद गल्ल्यांतून जखमींना लेडी रीडिंग रुग्णालयात नेताना रुग्णवाहिकांना मोठी कसरत करावी लागली.
डॉक्टर जखमींवर उपचार करून त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. तेथे मोठे गोंधळाचे वातावरण होते.
शायन हैदर यांनी सांगितले, की ते मशिदीत प्रवेश करत असताना हा मोठा स्फोट झाला. यामुळे ते रस्त्यावर फेकले गेले. जेव्हा डोळे उघडले तेव्हा सर्वत्र दाट धुरळा होता.
हल्ल्याची पद्धत ‘इस्लामिक स्टेट’ आणि ‘पाकिस्तान तालिबान’सारखी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्मघाती हल्लेखोराने या मशिदीत हा स्फोट घडविला. कोणत्याही दहशतवादी गटाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नसली, तरी इस्लामिक स्टेट आणि पाकिस्तानी तालिबान या दहशतवादी संघटनांनी पाकिस्तान- अफगाणिस्तानच्या सीमाभागात याच प्रकारचे हल्ले यापूर्वी केले आहेत. मशिदीच्या द्वारावरील पोलिसांवर गोळीबार केल्यानंतर एक हल्लेखोर मशिदीच्या आतील भागात पळत गेला आणि त्याने तेथे आपल्याजवळील बॉम्बचा स्फोट घडविला, असे पेशावरचे पोलीस प्रमुख मोहम्मद एजाज खान यांनी सांगितले. हा हल्ला झाला, त्यावेळी मशिदीत समारे दीडशे भाविक असावेत, असे पोलिसांचे म्हणणे आहे. ही मशीद फाळणीपूर्व काळापासून अस्तित्वात आहे. पाकिस्तानी तालिबानच्या दहशतवाद्यांना ताब्यात देण्याची मागणी यापूर्वी पाकिस्तान सरकारने अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारला केली आहे, पण त्याची पूर्तता झालेली नाही.