अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये हमीद करझई विमानतळावर सोमवारी तालीबानी दहशतवाद्याने नाटो सैनिकांच्या ताफ्याला लक्ष्य करत आत्मघाती हल्ला केला. विमानतळाच्या पर्वेकडील प्रवेशद्वारावर एका कारमध्ये बॉम्ब ठेवून दहशतवाद्याने स्फोट घडवून आणला. स्फोटात एका नागरिकाचा मृत्यू, तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींना सेक्युरिटी फोर्सेस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, कालच पाकिस्तान्या लष्करप्रमुखांनी काबूल येथे भेट दिली होती. तर दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी अफगाणिस्तानच्या एक दिवसीय दौऱयावर होते. मोदी देखील अफगाणिस्तानच्या याच विमानतळावर उतरले होते व तेथून अफगाणिस्तानच्या नव्या संसदेच्या इमारतीच्या उदघाटनाला रवाना झाले होते. भारताच्या सहय्याने उभारण्यात आलेल्या अफगाणिस्तानच्या नव्या संसदेच्या इमारतीचे मोदींच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. संसदेच्या एका ब्लॉकला ‘अटल ब्लॉक’ असे नाव देखील देण्यात आले आहे.