त्विशा शर्माने आत्महत्या केली, तिची हत्या झालेली नाही अशी माहिती भोपाळचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी दिली आहे. त्विशाचा विवाह सहा महिन्यांपूर्वी झाला होता. तिचा मृतदेह १२ मे रोजी तिच्या नवऱ्याच्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर त्विशाची हुंड्यासाठी हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या आई वडिलांनी केला होता. दरम्यान पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी त्विशाने आत्महत्याच केली आहे तिची हत्या झालेली नाही अशी माहिती आता दिली आहे. त्विशाची सासू गिरीबाला सिंग या माजी न्यायाधीश आहेत. त्यामुळे या प्रकरणात दबाव टाकला जातो आहे असाही आरोप त्विशाच्या घरातल्यांनी केला आहे. मात्र आता पोलीस आयुक्तांनीच ही आत्महत्या आहे असं म्हटलं आहे.

त्विशाच्या शवविच्छेदन अहवालात काय म्हटलं आहे?

भोपाळ येथील एम्स रुग्णालयाने दिलेल्या अहवालानुसार त्विशाच्या मानेवर समांतर अंतरावर दोन खुणा आहेत. नायलॉनच्या बेल्टने तिचा गळा आवळला गेल्याचं दिसतं आहे. मात्र हा बेल्ट ऑटोप्सी दरम्यान AIIMS च्या वैदकीय मंडळाला दिलेला नाही. १२ मे रोजी त्विशाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत तिच्या नवऱ्याच्या घरी आढळला होता. त्यानंतर आता हा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. त्याचप्रमाणे त्विशाच्या शरीरावर बऱ्याच जखमा दिसून येत आहेत असंही शवविच्छेदन अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान पोलिसांनी हा बेल्ट आम्ही नंतर जप्त केला कारण त्विशाचा मृतदेह आम्ही तिच्या घरुन ताब्यात घेतला नाही तर रुग्णालयातून ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला असं स्पष्टीकरणही दिलं आहे. पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ही आत्महत्या आहे असं म्हटलं आहे.

पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी काय सांगितलं?

त्विशाचा मृतदेह १२ मे रोजी तिच्या घरी होता, ज्यानंतर आम्ही या प्रकरणात सगळा तपास केला. आम्ही त्विशाच्या मृतदेहाचं शवविच्छेदनही केलं. मात्र यात कुठेही आढळून आलं नाही की त्विशाची हत्या झाली आहे. तसंच आम्हाला जे पुरावे सापडले आहेत त्यावरुनही हे स्पष्ट होतं आहे की ही आत्महत्या आहे. त्विशाची हत्या झालेली नाही. तिने आत्महत्या केली आहे असं पोलीस आयुक्तांनी म्हटलं आहे.

पोलिसांनी नायलॉनच्या पट्ट्याबाबत काय ११ मे रोजी काय सांगितलं?

त्विशा शर्माच्या मृत्यू प्रकरणात तपास करत असलेल्या विशेष तपास पथकाने म्हणजेच एसआयटीने हे स्पष्ट केलं आहे की त्विशाच्या नवऱ्याच्या घरातून नायलॉनचा एक पट्टा आम्ही जप्त केला आहे. मात्र शवविच्छेदन अहवालाच्या दरम्यान आम्ही तो डॉक्टरांना दिला नाही. एसीपी रजनीश कश्यप यांनी ही माहिती दिली. कश्यप पुढे म्हणाले की या प्रकरणाचा तपास अद्यापही सुरु आहे. आम्ही तिला जखमा कशा झाल्या होत्या याचाही शोध घेत आहोत. दरम्यान एसआयटीमध्ये असलेले पोलीस अधिकारी सुनील दुबे यांनी इंडियन एक्स्प्रेसला हे सांगितलं की त्विशाचा मृतदेह आम्ही पोलिसांनी तिच्या घरुन ताब्यात घेतला नाही.आम्ही भोपाळ एम्स रुग्णालयात आलो तेव्हा आम्हाला समजलं की तिचा मृत्यू झाला आहे. आम्ही रुग्णालयात पोहचेपर्यंत आम्हाला ही माहिती देण्यात आली की त्विशाने आत्महत्या केली आहे. त्यानंतर आमचं एक पथक हे तिच्या नवऱ्याच्या घरी गेलं. त्या ठिकाणी आम्हाला नायलॉनचा एक पट्टा सापडला आहे. व्यायाम करण्यासाठी हा पट्टा वापरला जातो. हा पट्टा आम्ही जप्त केला. पण त्यापूर्वी या ठिकाणी शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाली होती.

त्विशाचा नवरा समर्थ सिंग बेपत्ता

त्विशा शर्माचा मृत्यू झाल्यापासून तिचा नवरा समर्थ सिंग बेपत्ता आहे. तो कुठे आहे याबाबत कुणालाही अद्याप माहिती नाही.समर्थ सिंग हा पेशाने वकील आहे तर त्याची आई गिरीबाला सिंग या निवृत्त न्यायाधीश आहेत. दुसरीकडे त्विशाच्या सासूने म्हणजेच गिरीबाला सिंग यांनीही त्विशावर बरेच आरोप केले आहेत.

The latest controversy centres on a nylon belt that police claim was recovered from the scene and allegedly used in the hanging. (Express Photo/Image enhanced using AI)
त्विशा शर्मा या विवाहितेचा मृतदेह १२ मे रोजी तिच्या सासरी आढळून आला. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

गिरीबाला सिंग यांचे आरोप नेमके काय?

त्विशाची सासू (सेवानिवृत्त न्यायाधीश) गिरीबाला सिंग यांनी असा दावा केला आहे की, त्विशा अंमली पदार्थांच्या आहारी गेली होती आणि भोपाळमध्ये तिच्यावर मानसोपचार सुरू होते. जामीन अर्जात असा दावा करण्यात आला आहे की, ड्रग्स न मिळाल्यास त्विशाला शारीरिक अस्वस्थता आणि थरथराट जाणवायचा आणि नोएडा येथे तिला अंमली पदार्थ सहज उपलब्ध होत असत. त्यांनी पुढे असाही आरोप केला की, गरोदरपणानंतर तिच्या वर्तनात बदल झाला होता आणि नोएडाहून परतल्यानंतर तिने गांजाचे सेवन केले होते. जास्त प्रमाणात ड्रग्ज घेतल्यामुळे (ओव्हरडोज) तिचा गर्भपात झाला होता आणि तिचे सासरचे लोक तिच्यावर मानसोपचार करत होते, असेही या अर्जात नमूद करण्यात आले आहे.

कोण होती त्विशा शर्मा

त्विशा शर्मा ही मूळची नोएडाची असून तिने २००९ ते २०१२ दरम्यान मॉडलिंग क्षेत्रात प्रवेश केला. कठोर परिश्रम, ग्रुमिंग आणि चिकाटीच्या जोरावर तिने मिस पुणे सौंदर्य स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.

मिस पुणेचं विजेतेपद हा तिच्या आयुष्यातील सर्वांत मोठा टर्निंग पाँइंट होता. कारण, यानंतरच तिच्यासाठी जाहिरात, मॉडेलिंग आणि अभिनयाची दारे खुली झाली. त्विशाने व्यावसायिक जाहिरांतीमध्येही काम केलं आहे.

तेलुगू चित्रपटांतूनही त्विशा झळकली. ‘मुग्गुरु मोनागल्लू’हा तिचा पहिला तेलगू चित्रपट होता. तर, २०१८ मध्ये तिने ‘जरा संभल के’ नावाच्या लघुपटातही काम केले होते. तिच्याबरोबर काम करणाऱ्या अनेक सहकलाकारांनी तिच्या कामाचं कौतुकच केलं आहे. ती अत्यंत सर्जनशील, अभिव्यक्त आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी व्यक्ती होती, असं सहकलाकारांनी म्हटलं आहे.