…अन्यथा राजकारणातून निवृत्ती घेईन, सुजय विखे पाटील असं का म्हणाले ?

काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपा पक्षात प्रवेश करणाऱ्या सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांचा पराभव केला आहे

डॉ. सुजय विखे

काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपा पक्षात प्रवेश करणाऱ्या सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांचा पराभव केला आहे. सुजय विखे पाटील यांनी बंड पुकारल्याने हा निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती. त्यातच काँग्रेस नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील मुलासाठी प्रचारात उतरल्याने सर्वांचंच लक्ष या लढाईकडे लागलं होतं. मात्र सुजय विखे पाटील यांनी विजय मिळवत राष्ट्रवादीला पराभवाचा धक्का दिला. दरम्यान सुजय विखे यांनी जर आपल्याकडून अपेक्षित काम झालं नाही तर राजकारणातून निवृत्त होईन असं त्यांनी सांगितलं.

कोणत्याही पक्षात असलो तरी शेतकरी आणि सर्वसामान्याचं काम झालं पाहिजे. आज खासदार झालो असून लोकांसाठी या पदाचा वापर करेन. पण जर आपल्याकडून अपेक्षित काम झालं नाही तर राजकारणातून निवृत्त होईन असं सुजय विखे यांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी वडील राधाकृष्ण विखे पाटील यांना आता तुम्हीदेखील भाजपात यावं अशी विनंती केली.

आम्ही आमचं सगळं काही पणाला लावलं होतं. वडिलांना त्यांचं विरोधी पक्षनेतेपदही सोडावं लागलं होतं असं सांगताना निकाल लागल्यानंतर वडील फार आनंदात होते, त्यांना अभिमान वाटत असावा असं सुजय विखे यांनी सांगितलं. काँग्रेस पक्ष सोडण्यासंबंधी विचारलं असता नगरमध्ये आपला वारंवार आपमान झाला. अपमान सहन न झाल्यानं पक्ष सोडण्यचा निर्णय घेतला. पक्षाने आमच्या बाजूने उभं राहायला पाहिजे होतं. आम्ही पक्ष सोडल्यानंतर काँग्रेसची काय परिस्थिती झाली आहे ते दिसून येत आहे असं ते म्हणाले.

यावेळी सुजय विखे यांनी काँग्रेस एनसीपीच्या दबाबावाखील काम करतं अशी टीका करत स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात नाही असं म्हटलं आहे. काँग्रेस पक्ष सोडण्याच्या निर्णयावर राधाकृष्ण विखे पाटील यांची आता काय प्रतिक्रिया आहे असं विचारलं असता सुजय विखे यांनी सांगितलं की, माझा निर्णय योग्य होता असं आता ते म्हणत आहेत. आता तुम्हीदेखील भाजपात यावं अशी विनंती त्यांना केली आहे.

सन २००४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत पारनेर विधानसभा मतदार संघाचा समावेश कोपरगाव(नगर उत्तर ) लोकसभा मतदार संघात होता. तोपर्यंत डॉ.विखे यांचे आजोबा बाळासाहेब विखे लोकसभेमध्ये कोपरगाव मतदार संघाचे प्रतिनिधित्व करायचे.दिवंगत माजी खासदार बाळासाहेब विखे यांचे तालुक्यावर वर्चस्व होते.त्यांनी त्या वेळी उभारलेली कार्यकर्त्यांची फळी,कार्यकर्त्यांंचा संच तब्बल १५ वर्षांनंतरही टिकून आहे.विखे हाच आपला पक्ष हे मानणारा मोठा वर्ग आजही तालुक्यात आहे सुजय विखे यांच्या विजयाने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sujay vikhe patil will quit politics if didnt meet expectations lok sabha election

ताज्या बातम्या