Sukhbir Singh Badal Attacked Nanded: शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांच्यावर गुरुवारी नांदेडमधील गुरुद्वारा मत्ता साहिब देवनजी येथे हल्ला झाला. जसपाल सिंग या निहंग शीख व्यक्तीने बादल यांच्यावर किरपाणीने हल्ला केला. या हल्ल्याबाबत पोलिसांना सिंगने माहिती दिली आहे. “नांदेडच्या गुरुद्वारात प्रार्थना करत असताना वाहेगुरूंकडून दिव्य आज्ञा मिळाली होती”, असे जसपाल सिंग पोलिसांशी बोलताना म्हणाला.

बादल यांच्यावर किरपाणीने हल्ला

सुखबीर बादल गुरुद्वारात पायऱ्या उतरत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. इतर तिघा जणांसोबत तिथं उभा असलेला जसपालने किरपाणी घेऊन बादल यांच्या दिशेने धावला, व हल्ला केला, यात बादल यांच्या हाताला दुखापत झाली आहे. दरम्यान, या घटनेनंतर संशयित आरोपी जसपाल सिंगला अटक करण्यात आली असून, चौकशीसाठी नांदेड पोलीस मुख्यालयात नेण्यात आले.

जसपालने पोलिसांना काय सांगितले?

चौकशीदरम्यान, जसपाल सिंगने पोलिसांना माहिती दिली. जसपालने २०२३ मध्ये संन्यास घेतल्याचे पोलिसांना सांगितले. पुण्यात त्याची पत्नी आणि मुलगी आहे. तो नांदेडमध्ये निहंग सेवेकरी असून, निहंग होण्यापूर्वी तो पेशाने वकील होता आणि मुंबईतील एका कॉर्पोरेट फर्ममध्ये काम करत होता. दरम्यान, जसपाल सिंगने एकट्याने हे कृत्य केले असून, त्याला बाह्यमदत मिळाली नसल्याचे जसपाल सिंगची चौकशी करणाऱ्या एका अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले.

पोलीस कोठडीची करणार मागणी

पंजाबची परिस्थिती आणि तेथील ड्रग्जच्या समस्या यासारखी विविध कारणे सांगत, त्याच्या मनात बादल यांच्यावर हल्ला करण्याची भावना निर्माण झाल्याचा दावा जसपालने केला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. जसपाल सिंगला शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार असून त्याच्या कोठडीची मागणी केली जाईल, असे पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांनी सांगितले. बादल यांच्या सुरक्षा पथकातील एक महाराष्ट्र पोलीस अधिकारी देखील या हल्ल्यात किरकोळ जखमी झाला आहे. बादल हे सुद्धा या हल्ल्यात जखमी झाले. उपचारासाठी दोघांनाही स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.