पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांच्यावर महाराष्ट्रातील नांदेड येथील गुरुद्वारात झालेल्या हल्ल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. उपचारांनंतर खासगी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “मी अशा हल्ल्यांना अजिबात घाबरत नाही आणि पुढेही कधी घाबरणार नाही.”

गुरुद्वारात झाला होता जीवघेणा हल्ला

नांदेड येथील गुरुद्वारात दर्शन घेत असताना ६२ वर्षीय जसपाल सिंग या निहंग शीख व्यक्तीने सुखबीर सिंग बादल यांच्यावर कृपाणाने म्हणजेच तलवारीने वार केले. या अचानक झालेल्या हल्ल्यात बादल यांच्या हाताला आणि खांद्याला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर उपस्थित सुरक्षारक्षक आणि नागरिकांनी प्रसंगावधान राखून हल्लेखोराला तातडीने ताब्यात घेतले, तर जखमी बादल यांना उपचारासाठी नांदेडमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सुखबीरसिंग बादल नेमकं काय म्हणाले?

“पंजाबमधील शांतता भंग करणे हाच विरोधकांचा मूळ हेतू आहे, परंतु अकाली दलाचा अध्यक्ष म्हणून मी हा कट कधीही यशस्वी होऊ देणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. पवित्र स्थळीच हल्ले झाले तरी घाबरणार नाही, असे सांगत त्यांनी पंजाबचा स्वाभिमान आणि सामाजिक बंधुभाव टिकवण्यासाठी कटिबद्धता दर्शवली. पंजाबच्या प्रगतीसाठी आणि धार्मिक सलोख्यासाठी कोणताही त्याग करण्यास तयार असल्याचे बादल म्हणाले. डिसेंबर २०२४ मध्ये अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातही त्यांच्यावर असाच हल्ला झाला होता.

रुग्णालयातून डिस्चार्ज, प्रकृती स्थिर

रुग्णालयात योग्य ते वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांनी सुखबीर सिंग बादल यांच्या प्रकृतीची तपासणी करून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला आहे. त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर आणि स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

हल्लेखोर पुण्याचा रहिवासी

घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत हल्लेखोर जसपाल सिंग याला अटक केली आहे. पोलीस तपासात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संशयित आरोपी जसपाल सिंग हा मूळचा पुण्याचा रहिवासी आहे. या हल्ल्यामागील नेमका हेतू काय होता आणि यामागे काही कटकारस्थान आहे का, याचा सखोल तपास पोलीस सध्या करत आहेत.