MP Sukhendu Sekhar Roy On TMC Future: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा दारुण पराभव झाला. १५ वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या ममता बॅनर्जी यांना हा पराभव चांगलाच जिव्हारी लागला आहे. पक्षातील नेत्यांना देखील या पराभवाचा धक्का बसला आहे. या पराभवावरुन आता तृणमूल काँग्रेसमधील नेतेच पक्षावर टीका करु लागले आहेत. तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार सुखेंदू शेखर रॉय यांनी पक्षाच्या अस्तित्वावरच भाष्य केले आहे.

तृणमूल काही दिवसात संपेल – खासदार रॉय

निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालमध्ये आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा बलात्कार करुन खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. हे प्रकरण देशभर गाजले होते. बंगाल सरकारवर देखील याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. दरम्यान, अलिकडे खासदार सुखेंदू शेखर रॉय यांनी एनडीटीव्ही दिलेल्या मुलाखतीत, “तृणमूल काँग्रेस काही दिवसांत संपेल”, असे मत मांडले आहे. “तृणमूल काँग्रेस काही दिवसांतच संपेल. राष्ट्रीय राजकारणातही या पक्षाने आपली विश्वासार्हता गमावली आहे. आता कोणताही पक्ष तृणमूलबरोबर हात मिळवणार नाही,”

आर.जी. करवरुन पक्षाच्या भूमिकेवर सवाल

सुखेंदू शेखर रॉय यांनी आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयात घडलेल्या घटनेबाबतही नाराजी व्यक्त करत सरकारने परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली नाही असे मत मांडले. “दोषींना वाचविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, यासाठी पोलिसांचा वापर करण्यात आला”, असा आरोप देखील खासदार रॉय यांनी केला. या प्रकरणानंतर राज्यात निघालेले मोर्च आणि आंदोलनामुळे नागरिकांच्या भावना पक्षाच्या विरोधात असल्याचे पहिल्यांदा जाणवले असे रॉय एनडीटीव्हीशी बोलताना म्हणाले. पक्ष लोकांच्या भावना समजून घेण्यात अपयशी ठरल्याचे रॉय म्हणाले.

पक्षाच्या नेत्यांवर गंभीर आरोप

पक्षातील नेत्यांच्या भ्रष्टाचारावर देखील खासदार रॉय यांनी टीका केली. “पक्षातील नेत्यांनी उभारलेले भ्रष्टाचाराचे डोंगर विचारांच्या पलिकडे आहेत. ममता बॅनर्जींना त्यावर नियंत्रण ठेवता आले नाही. ममता बॅनर्जींनी हिंदू धर्मावर केलेली टीका अयोग्य होती. हिंदू धर्माला नावं ठेवणं, समाजावार टीका करणे चुकीचे आहे. हे राजकीय तत्वांच्या विरोधात आहे”, असे खासदार रॉय म्हणाले. विधानसभेतील पराभवाची जबाबदारी प्रत्येक नेत्याने स्वीकारायला हवी, असेही रॉय यांनी नमूद केले. दरम्यान, पक्षाच्या खासदार काकोली घोष यांनी देखील राजीनामा देताना अशाच प्रकारचे आरोप पक्षावर केले होते.