Sukhoi Su-30MKI Fighter Jet: भारतीय हवाई दलाचे (IAF) सुखोई Su-30 MKI लढाऊ विमान आसाममध्ये बेपत्ता झाले आहे. उड्डाण केल्यानंतर लढाऊ विमानाचा रडारशी संपर्क तुटल्याची माहिती भारतीय हवाई दलाने सोशल मीडिया एक्सवरून दिली आहे. दरम्यान, विमानाचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केल्याची माहितीही हवाई दलाने दिली आहे.

हवाई दलाने काय माहिती दिली?

“एसयू-३० एमकेआय विमानाला विलंब झाल्याचे वृत्त आहे. आसाममधील जोरहाट येथून विमानाने उड्डाण केले होते, संध्याकाळी ७.४२ वाजता त्याच्याशी शेवटचा संपर्क झाला होता. दरम्यान, याबाबत अधिक माहिती मिळवली जात आहे. शोध आणि बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे”, अशी एक्स पोस्ट हवाई दलाने केली आहे.

वैमानिकाबरोबर संपर्क होईना?

या लढाई विमानातील वैमानिकाबरोबर संपर्क होत नसल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, सु-३० एमकेआय हे विमान कार्बी आंगलोंग जिल्ह्यात उड्डाण करत असताना संध्याकाळी ७ वाजता बेपत्ता झाले. हवाई दलाकडून विमानाचा शोध घेतला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

जून २०२४ मध्ये सु-३० एमकेआय झाले होते क्रॅश

जून २०२४ मध्ये, महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात सुखोई सु-३० एमकेआय बेपत्ता झाल्याची अशीच एक घटना उघडकीस आली होती. दरम्यान, निफाडमधील शिरसगाव गावाजवळ हे विमान कोसळले होते. पण, पायलट आणि सह-पायलट सुरक्षितपणे बाहेर पडण्यात यशस्वी झाले, अशी माहिती हवाई दलाने दिली होती. 

सु-३० एमकेआय लढाऊ विमानाची माहिती

सुखोई सु-३०एमकेआय हे भारतीय हवाई दलातील लढाऊ विमान आहे. दोन आसनी या लढाऊ विमान ट्विनजेट ४.५ क्षमतेचे आहे. रशियाच्या सुखोईने ते विकसित केले आहे. भारतात एचएएल याची निर्मिती करते. सु-३०एमकेआयची ३००० किमी रेंज असून, त्याच्यात ब्रह्मोस देखील डागण्याची क्षमता आहे.