रशिया आपल्या एअर फोर्ससाठी सुखोई एसयू-५७ हे पाचव्या पिढीचे स्टेल्थ फायटर विमान विकसित करत आहे. “भारत सध्या तरी आपल्या हवाई दलासाठी एसयू-५७ विमानाचा विचार करत नाहीय. रशियन एअर फोर्समध्ये या फायटर विमानाचा वापर सुरु झाल्यानंतर त्याचे मूल्यमापन करता येईल” असे इंडियन एअर फोर्सचे प्रमुख बी.एस.धनोआ यांनी रशियन दौऱ्यावर असताना क्रास्नया झवेझ्दा वर्तमानपत्राला सांगितले. क्रास्नया झवेझ्दा रशियन संरक्षण मंत्रालयाचे अधिकृत वर्तमानपत्र आहे.

एसयू-५७ चा रशियन एअर फोर्समध्ये समावेश झाल्यानंतर या सिंगल सीट, टि्वन इंजिन सुपरसॉनिक विमानाबद्दल निर्णय घेता येईल असे धनोआ म्हणाले. “तुम्ही एसू-५७ बद्दल बोलत असाल तर आम्ही त्याबद्दल विचार केलेला नाही. तुम्ही त्याचा वापर सुरु केल्यानंतर आम्ही त्याबद्दल निर्णय घेऊ” भारत आणि रशिया एकत्र येऊन फायटर विमानाची निर्मिती करण्यासंबंधी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर धनोआ यांनी हे उत्तर दिले.

रशियाचा दौरा हा समृद्ध करणारा अनुभव होता. रशियाच्या निमंत्रणावरुन धनोआ तिथे गेले होते. तिथे रशियन संरक्षण दलाच्या प्रमुखांबरोबर त्यांनी चर्चा केली. रशियन युनायटेड एअरक्राफ्ट कॉरर्पोरेशनचा भाग असलेली सुखोई एअरक्राफ्ट कंपनी या विमानाची निर्मिती करत आहे. २९ जुलैला कंपनीने एसयू-५७ चे मोठया प्रमाणावर उत्पादन करण्याच्या टप्प्यावर पोहोचलो असल्याचे जाहीर केले.

रशियन एअर फोर्ससाठी ७६ एसयू-५७ ची निर्मिती करण्यासाठी सुखोईने संरक्षण मंत्रालयाबरोबर करार केला आहे. २०१९ च्या आधी पहिले एसयू-५७ फायटर जेट रशियन हवाई दलात दाखल होईल. भारत आणि रशिया मिळून पाचव्या पिढीचे फायटर जेट विकसित करणार होते. पण काही मुद्दांवरुन मतभेद झाल्यानंतर भारताने या प्रकल्पातून माघार घेतली. एसयू-५७ ची मुख्य स्पर्धा अमेरिकेच्या एफ-२२ रॅप्टर आणि एफ-३५ या पाचव्या पिढीच्या फायटर विमानांबरोबर आहे.