कॅनडातील व्हॅनकोवर पोलीस विभागातील शीख कॉन्स्टेबल सुखविंदर ‘सुकी’ सिंग संगर यांनी २०२६ च्या रॉयल एडिनबर्ग मिलिटरी टॅटूमध्ये बँडचे नेतृत्व करत इतिहास रचला आहे. या कार्यक्रमात पगडीधारी शीख ड्रम मेजर म्हणून मार्चचे नेतृत्व करणारे ते पहिले व्यक्ती ठरल्याचे सांगितले जात आहे. याबद्दल सविस्तर वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

एडिनबर्ग कॅसलसमोर केले नेतृत्व

संगर यांनी व्हॅनकोवर पोलीस पाइप बँडचे ड्रम मेजर म्हणून एडिनबर्ग कॅसलसमोरील मैदानावर प्रवेश केला. ७ ते २९ ऑगस्टदरम्यान झालेल्या या कार्यक्रमात जगभरातील लष्करी बँड आणि सांस्कृतिक कलाकार सहभागी झाले होते. यावेळी संगर यांनी पारंपरिक स्कॉटिश पोशाख परिधान केला होता. टार्टन किल्टसोबत त्यांनी पंखांच्या पारंपरिक टोपीऐवजी त्याच रंगांशी जुळणारी पगडी परिधान केली होती.

२००२ पासून व्हॅनकोवर पोलीस विभागात सेवा

कॅनेडियन प्रकाशन ‘दर्पण’मधील माहितीनुसार, संगर यांचे बालपण ब्रिटिश कोलंबियातील व्हिक्टोरिया येथे गेले. त्यांनी व्हिक्टोरिया पोलीस विभागात राखीव कॉन्स्टेबल म्हणून कारकीर्द सुरू केली आणि २००२ मध्ये व्हॅनकोवर पोलीस विभागात प्रवेश केला. गुन्हे न्यायशास्त्राचे पदविका शिक्षण घेतलेल्या संगर यांनी पोलीस दलात दोन दशकांहून अधिक काळ सेवा केली. वाहतूक नियमांची अंमलबजावणी हे त्यांच्या कामाचे प्रमुख क्षेत्र राहिले आहे. त्यांनी दक्षिण सुदानमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेतही काम केले आहे.

बँडमध्ये पहिले शीख सदस्य

१९१४ मध्ये स्थापन झालेला व्हॅनकोवर पोलीस पाइप बँड ब्रिटिश कोलंबियातील सर्वात जुना सातत्याने कार्यरत बिगरलष्करी पाइप बँड आहे. तो व्हॅनकोवर शहराचा अधिकृत बँड म्हणूनही काम करतो. संगर २०१८-१९ च्या सुमारास बँडमध्ये सहभागी झाले. ते बँडचे पहिले शीख सदस्य ठरले. सुरुवातीला ते टेनर ड्रम वाजवत होते. नंतर त्यांनी पंजाबी ढोलचाही बँडच्या सादरीकरणात समावेश केला.

भारतातील सुवर्ण मंदिरातही केले होते सादरीकरण

२०१९ मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडाच्या शताब्दीनिमित्त बँड भारताच्या दौऱ्यावर आला होता. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरासह गुरु नानक देव विद्यापीठ आणि पंजाबमधील इतर ठिकाणी बँडने सादरीकरण केले. या कार्यक्रमांमध्ये ‘सारे जहाँ से अच्छा’च्या एका सादरीकरणासह, संगर यांनी स्कॉटिश टेनर ड्रमसोबत ढोलही वाजवला.

तीन वर्षांसाठी ड्रम मेजर

डिसेंबर २०२५ मध्ये बँडने संगर यांची तीन वर्षांसाठी ड्रम मेजर म्हणून निवड केली. संगर यांच्या पगडी आणि दाढीसह स्कॉटिश पोशाख आणि बँडचे शिस्तबद्ध संचलन सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं.