सुकमा – छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत ५ लाख रुपयांचे बक्षीस असलेला एक नक्षलवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली. ही चकमक पोलमपल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात झाली. मृत नक्षलवाद्याचे नाव मुचकटी कैलाश असे आहे. तो माओवादी संघटनेच्या प्लाटून क्रमांक ३१ चा कमांडर होता. जिल्हा राखीव पथक, राज्य पोलिसांची विशेष तुकडी नक्षलविरोधी मोहिमेवर असताना माओवादी तेथे असल्याबाबतच्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांनी सांगितले.
कैलाश हा आयईडी स्फोटके लावणे आणि पोलिसांवरील हल्ल्यांमध्ये सहभागी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बस्तर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पाटिलिंगम यांनी सांगितले की, आत्मसमर्पणाची संधी आता अंतिम टप्प्यात आहे आणि माओवादी कार्यकर्त्यांकडे त्याचा लाभ घेण्यासाठी मर्यादित वेळ उरला आहे. त्यांनी नक्षलवाद्यांना हिंसेचा मार्ग सोडून शांततामय आणि सन्मानजनक जीवनासाठी मुख्य प्रवाहात परतण्याचे आवाहन केले.
