भारतीय संगीतसृष्टीतील सुवर्णकाळाच्या साक्षीदार आणि आपल्या मधुर आवाजाने करोडो रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे संगीत विश्वावर शोककळा पसरली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘X’ (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून पोस्ट करत सुमनजींच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले.
पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, “लोकप्रिय गायिका सुमन कल्याणपूर जी यांच्या निधनामुळे मला अत्यंत दुःख झाले आहे. त्यांच्या सुमधुर आवाजाने आणि भावपूर्ण गायकीने आपल्या सांस्कृतिक क्षेत्राला खऱ्या अर्थाने समृद्ध केले. त्यांनी गायलेल्या गाण्यांमुळे संगीतप्रेमी आणि भारतीय चित्रपटाच्या चाहत्यांच्या मनात त्यांनी एक हक्काचे व विशेष स्थान निर्माण केले होते. मी त्यांच्या कुटुंबियांच्या आणि जगभरातील चाहत्यांच्या दुःखात सहभागी आहे. ओम शांती.”
सुमन कल्याणपूर यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीला अनेक अजरामर गाणी दिली. ज्या काळात लता मंगेशकर, आशा भोसले आणि शमशाद बेगम यांसारख्या दिग्गज गायिकांचा दबदबा होता, त्या काळात सुमनजींनी आपल्या कौशल्याच्या जोरावर स्वतःचे एक अढळ आणि स्वतंत्र स्थान निर्माण केले. त्यांच्या आवाजातील आर्तता आणि स्पष्ट शब्दोच्चार रसिकांना नेहमीच भुरळ घालत असत.
मराठी मनावर अधिराज्य गाजवणारी गाणी
मराठी संगीत विश्वात तर सुमन कल्याणपूर यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांनी गायलेली अनेक गाणी आजही प्रत्येक मराठी घराघरात गुंजत असतात. यात प्रामुख्याने ‘जिथे सागरा धरणी मिळते’, ‘घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात’, ‘निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई’ (अजरामर अंगाईगीत), ‘केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर’, ‘देव माझा विठु सावळा’, ‘कशी गवळण राधा बावरली’ यांसारख्या अनेक गाण्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्यांनी गायलेले ‘उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले’ हे बालगीत आजही लहान मुलांच्या ओठांवर तितक्याच आवडीने रेंगाळताना दिसते.
बांगलादेश ते मुंबई; असा होता जीवनप्रवास
सुमन कल्याणपूर यांचा जन्म २८ जानेवारी १९३८ रोजी भवानीपूर येथे झाला होता. हे ठिकाण फाळणीपूर्वीच्या अविभाजित भारतात होते, जे आता बांगलादेशात आहे. त्यांचे माहेरचे नाव ‘सुमन हेमाडी’ असे होते. त्यांचे वडील शंकरराव हेमाडी हे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत होते. वडिलांच्या बदलीमुळे त्यांचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले आणि येथूनच सुमनजींच्या सांगितीक प्रवासाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. लग्नापूर्वी त्यांनी ‘सुमन हेमाडी’ या नावानेच अनेक लोकप्रिय गाणी गायली होती.
गीतगायनाव्यतिरिक्त सुमनजींना चित्रकलेचीही प्रचंड आवड होती. त्यांनी केवळ मराठी किंवा हिंदीच नव्हे, तर बंगाली, उडिया, पंजाबी, राजस्थानी, कानडी आणि भोजपुरी अशा अनेक भाषांमध्ये गाणी गायली. गझल, ठुमरी, भक्तीगीते आणि भावगीते गाण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रातील एका सुवर्ण पर्वाचा अंत झाला आहे, अशा भावना सर्व स्तरांतून व्यक्त केल्या जात आहेत.
