मुंबई : देशात उन्हाळी हंगामात सरासरी ७५.३७ लाख हेक्टरवर पेरणी होते. पण, गतवर्षी पावसाळ्यात सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे ८३.०८ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. गतवर्षीही विक्रमी ८३.९२ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती.

केंद्रीय कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उन्हाळी हंगामात सर्वाधिक ३१.०५ लाख हेक्टरवर भाताची लागवड झाली आहे. त्या खालोखाल हिरवा हरभरा २०.०७ लाख हेक्टर, काळा हरभरा ४.६० लाख हेक्टर आणि अन्य कडधान्यांची ३० हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे.

श्री अन्नाची लागवड १६.०१ लाख हेक्टर लागवड झाली आहे. त्यात ज्वारी ३७ हजार हेक्टर, बाजरी ५.४० लाख हेक्टर, नाचणी २२ हजार हेक्टर, लहान श्री अन्न तीन हजार हेक्टर आणि मक्याची लागवड १० लाख हेक्टरवर झाली आहे. तेलबियांची एकूण लागवड ११.०४ लाख हेक्टरवर झाली असून, त्यात भुईमूग ५.५१ लाख हेक्टर, सूर्यफूल ०.३९ हेक्टर, तीळ ५.०७ लाख हेक्टर, अन्य तेलबिया सात हजार हेक्टरवर लागवड झाली आहे.

देशात उन्हाळी हंगामातील पेरणी क्षेत्र सरासरी ७५.३७ लाख हेक्टर आहे. पावसाळ्यातील पाऊस, धरणे, नद्यांमधील उपलब्ध पाणी यावर उन्हाळी लागवड अवलंबून असते. उत्तर भारतात नद्यांची पाणी पातळी कमी झाल्यानंतर नदी पात्रात उन्हाळी पिके घेतली जातात. यंदा उन्हाळी हंगामात एकूण ८३.०८ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. गतवर्षी ८३.९२ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती.