‘शिबिरांचा अहवाल सादर करा’

कोलकात्यातील काही भागात अशी बनावट शिबिरे राबवण्यात आली

COVID-19-Vaccine
(संग्रहित छायाचित्र)

पश्चिम बंगालमधील बोगस लसीकरण

पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी बनावट करोना लसीकरण शिबिरे राबवण्यात आली असून त्यात अनधिकृत तोतया आयएएस अधिकारी सामील होते असे दिसून आले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने त्याबाबत पश्चिम बंगाल सरकारकडे अहवाल मागितला आहे. कोलकात्यातील काही भागात अशी बनावट शिबिरे राबवण्यात आली त्याचा अहवाल दोन दिवसांत सादर करावा असे आदेशात म्हटले आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पश्चिम बंगालचे आरोग्य सचिव हरीकृष्ण द्विवेदी यांना संदेश पाठवला असून या घटनेबाबतचा अहवाल मागवला आहे. पश्चिम बंगालमधील भाजप नेते व विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी यांनी याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. त्यात अनधिकृत लोकांनी कोविड लसीकरण शिबिरे घेतल्याचे म्हटले होते. कोलकाता महापालिका भागात कसबा वसाहतीत ही शिबिरे घेण्यात आली. कुणालाही लस न देताच कोविन अ‍ॅपच्या माध्यमातून लस दिल्याची प्रमाणपत्रे जारी करण्यात आली. या शिबिरांबाबत शंका असल्याचे पत्रात म्हटले होते.  लाभार्थींना लसीकरण प्रमाणपत्रे जारी करण्यात यावीत. अन्यथा संबंधित शिबिर बोगस जाहीर करण्यात येईल, असे केंद्राने राज्यांना सांगितले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Summit camp report bogus vaccination in west bengal akp