पीटीआय, माल्दा (पश्चिम बंगाल)
दिल्लीमधून ताब्यात घेऊन बांगलादेशला पाठवण्यात आलेल्या सुनाली खातून ही २६ वर्षीय गर्भवती महिला तिच्या लहान मुलासह शुक्रवारी भारतात परतली. तिला मानवतावादाच्या दृष्टिकोनातून परत आणावे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिले होते.

सुनाली बांगलादेशी असल्याच्या संशयावरून दिल्ली पोलिसांनी तिच्यासह तिचा आठ वर्षीय मुलगा साबीर यांना बांगलादेशात पाठवले होते. याविरोधात आधी कलकत्ता उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने २६ सप्टेंबरला दिलेल्या निकालात सुनाली खातून आणि इतरांना बांगलादेशात पाठवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय स्थगित केला होता. त्याला केंद्राने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, त्याविरोधात सुनालीचे वडील भोदू शेख यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. आपण भारतीय आहोत आणि सुनालीदेखील भारतीय आहे, असे त्यांनी न्यायालयाला सांगितले.

दिल्ली पोलिसांनी घुसखोर असल्याच्या संशयावरून सुनालीची रवानगी बांगलादेशात केल्यानंतर, तेथील सुरक्षा यंत्रणांनी तिला घुसखोर असल्याच्या आरोपावरून तुरुंगात टाकले होते. ती १०३ दिवस बांगलादेशच्या तुरुंगात होती. अखेर शुक्रवारी संध्याकाळी तिला माल्दा सीमेवरून भारतात आणले गेले. मात्र, तिच्याबरोबर पाठवण्यात आलेल्या इतर चार जणांना परत कधी आणले जाणार याविषयी कोणतीही स्पष्ट माहिती दिली गेली नाही. सुनालीबरोबर बांगलादेशात पाठवलेल्या सर्वांना परत आणावे असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.