तामिळनाडू, आसाम, पश्चिम बंगाल, केरळ आणि पुद्दुचेरीमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल ४ मे रोजी जाहीर झाले आहेत. या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपाने मोठी मुंसडी मारली आहे. भाजपाने पश्चिम बंगालमध्ये बहुमत मिळवलं असून आता भाजपा तेथे सरकार स्थापन करणार आहे. मात्र, बंगालच्या या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी पक्षाला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये भाजपाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भारतीय जनता पक्षाच्या या ऐतिहासिक विजयामागे एक खास व्यक्ती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. बंगालमधील भाजपाच्या विजयाचे खरे शिल्पकार सुनील बन्सल असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर सुनील बन्सल नेमकं कोण आहेत? जाणून घेऊयात.

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून भाजपाचे अनेक दिग्गज नेते पश्चिम बंगालमध्ये ठाण मांडून होते. भाजपाच्या अनेक नेत्यांनी पश्चिम बंगालमध्ये अनेक रॅली, सभा आणि मेळावे घेतल्याचंही पाहायला मिळालं. भाजपाचे सुनील बन्सल, भूपेंद्र यादव, बिप्लब कुमार देब आणि अमित मालवीय यांच्यासह आदी नेते गेल्या काही महिन्यांपासून पश्चिम बंगालमध्ये जाऊन फक्त भाजपा नेत्यांच्या मोठ्या जाहीर सभांवर अवलंबून न राहता बूथ-स्तरावर आणि प्रचारावर लक्ष केंद्रित करत होते असं सांगितलं जातं. या संदर्भातील वृत्त फायनान्शिअल एक्स्प्रेसने दिलं आहे.

२०१४ पासून भाजपा नेतृत्वाने पश्चिम बंगालला देशातील सर्वात राजकीय आव्हानांपैकी एक मानलं होतं. पश्चिम बंगालमधील राजकारण, तेथील संस्कृती, प्रबळ प्रादेशिक पक्ष, डाव्या व नंतर तृणमूल काँग्रेसचं वर्चस्व अशा अनेक गोष्टींवर मात करून विजय मिळवण्यासाठी भाजपा अनेक महिन्यांपासून रणनिती आखत होतं, त्यानंतर अखेर या निवडणुकीत भाजपाला यश मिळालं आहे.

सुनील बन्सल कोण आहेत?

बंगालच्या निवडणुकीच्या रणनीतीची जबाबदारी भाजपाने बन्सल यांच्यावर सोपवली होती असं बोललं जात आहे. बन्सल यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं. तसेच याआधी बन्सल यांनी उत्तर प्रदेश आणि ओडिशा या सारख्या राज्यांमध्येही बूथ-स्तरावर जाऊन निवडणूक व्यवस्थापनाच्या माध्यमातून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती.

यावेळी बंगालमध्ये बन्सल यांनी मोठ्या घोषणांवर कमी आणि पक्षाच्या स्थानिक संघटनात्मक रचनेवर अधिक लक्ष केंद्रित केलं होतं. तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात मतदान केंद्र, मतदार समूह यासह घरोघरी जाऊन पक्षाचा प्रचार केला. पश्चिम बंगालमध्ये जवळपास ८०,००० मतदान केंद्र आहेत. भाजपाच्या अंतर्गत सूत्रांनी दावा केला की पक्षाने ६५ हजारांहून अधिक मतदान क्षेत्रांमध्ये सक्रिय बूथ समित्या स्थापन केल्या होत्या. त्यामुळे भाजपाचा विश्वास होता की यामुळे पक्षाला मतदारांपर्यंत पोहोचणं, मतदानाच्या दिवशी लोकांना एकत्र आणणं आणि स्थानिक संवाद वाढवणं यासाठी मोठा फायदा होईल.

याबरोबरच पंधरा वर्षे सत्तेत असलेल्या टीएमसी सरकारविरोधात वाढणाऱ्या सत्ताविरोधी लाटेचाही भाजपाला मोठा फायदा झाला. तसेच शालेय भरती घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचाराचे आरोप आणि इतर चौकशा हे प्रचाराचे मुख्य मुद्दे राहिले आहेत. भाजपाच्या नेत्यांनी रॅली आणि जाहीर सभांच्या माध्यमातून या मुद्द्यांवरून टीएमसीवर टीका केली.

भाजपाची बंगालमधील प्रचार मोहीम कशी होती?

बंगालमधील प्रचाराच्या मोहिमेत भाजपाचे अनेक नेते आणि संघटक सामील होते. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यासह भाजपाचे अनेक नेत्यांवर महत्वाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यामध्ये बी.एल.संतोष यांनी संघटनात्मक समन्वयाची जबाबदारी सांभाळली. भूपेंद्र यादव यांनी राजकीय समन्वय आणि आघाडीचं नियोजन सांभाळलं. मंगल पांडे यांनी जिल्ह्यांमध्ये कार्यकर्त्यांची जमवाजमव आणि निवडणूक व्यवस्थापनाचं काम पाहिलं. अमित मालवीय यांनी भाजपाच्या डिजिटल आणि संवाद धोरणाचं काम पाहिलं. या प्रचारमोहिमेत आर.जी.कर प्रकरण, शाळा भरतीचा वाद आणि टीएमसी सरकारच्या कामगिरीवर टीका असे अनेक मुद्दे प्रभावी ठरले आहेत.