आगामी वर्षाच्या स्वागताची सध्या सर्वत्र जोरदार तयारी केली जात आहे. यादरम्यान उत्तर प्रदेशच्या मथुरा येथील एका बारमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अभिनेत्री सनी लिओनीच्या कार्यक्रमावरून वाद पेटला आहे. शहरातील पुजाऱ्यांनी या कार्यक्रमाला विरोध दर्शवल्यानंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
बारकडून जारी करण्यात आलेल्या प्रमोशनल व्हिडीओमध्ये सांगण्यात आले होते की, सनी लिओनीने ती १ जानेवारी रोजी डीजे (डिस्क जॉकी) म्हणून नवीन वर्ष “किक स्टार्ट” करण्यासाठी येथे येणार आहे. मात्र हा व्हिडीओ समोर आल्यानंतर काय कार्यक्रमाला प्रचंड विरोधाचा सामना करावा लागली
“मी डीजे म्हणून एका अविस्मरणीय रात्रीसह नवीन वर्षाची जबरदस्त सुरूवात करण्यासाठी १ जानेवारी रोजी मथुरा येथे येत आहे, हे सांगताना मला खूप आनंद होत आहे,” असे लिओनी व्हिडीओमध्ये म्हणाली होती. “सर्वात मोठ्या बॉलीवूड सेन्सेशन”चा कार्यक्रम असे या आयोजनाचे वर्णन करण्यात आले होते.
मात्र, पुजाऱ्यांनी मथुरा ही एक ‘देव भूमी’ असल्याचे सांगत हा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली. त्यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात एका पुजार्यांनी म्हटले आहे की, लिओनी ही एक माजी ‘अडल्ट स्टार’ आहे आणि या कार्यक्रमात अश्लीलता दाखवण्याची तयारी सुरू आहे.
संपूर्ण जगभरातून भाविक मथुरा येथे पूजा-अर्चना करण्यासाठी येतात. काही लोकांकडून या पवित्र भूमीला बदनाम करण्याचा कट रचला जात आहे. असे कार्यक्रम आयोजित करून धार्मिक भावना भडकवण्याची त्यांची योजना आहे. हे लोक धार्मिक शहराला बदनाम करू इच्छित आहेत, असे या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान या कार्यक्रमाला जोरदार विरोध होत असल्यामुळे बारने हा कार्यक्रम रद्द केला आहे. आदरणीय आणि पूजनीय ऋषी-मुनींचा सन्मान राखत, आम्ही १ जानेवारीचा सनी लिओनीचा कार्यक्रम रद्द करत आहोत, असे त्या बारकडून सांगण्यात आले आहे.
