Super 30 Founder Anand Kumar : दिल्लीतील एका आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात अचानक पावसाचे पाणी शिरल्याने यूपीएससीची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. या घटनेनंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या घटनेनंतर या कोचिंग सेंटरवर कारवाई करण्यात आली. तसेच या कोचिंग सेंटरच्या मालकालाही अटकही झाली होती. या घटनेवर दिल्ली महानगरपालिकेने बेकायदा बेसमेंटमध्ये असलेल्या कोचिंग सेंटरवर कारवाई केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर आता ‘सुपर ३०’ चे संस्थापक आनंद कुमार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. “अशा प्रकारच्या घटना घडणे अत्यंत निराशाजनक आहे. मात्र, येत्या १० ते १५ वर्षात ९० टक्के ऑफलाइन कोचिंग सेंटर्स बंद होतील”, असा मोठा दावा आनंद कुमार यांनी केला आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआयने दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आनंद कुमार यांनी म्हटलं की, “माझ्या अनुभवावरून मी असं म्हणू शकतो की, येत्या १० ते १५ वर्षांत ९० टक्के ऑफलाइन कोचिंग सेंटर्स बंद होतील. कारण आतापर्यंत ऑनलाइन अभ्यासात केलेल्या प्रयोगांची संख्या फक्त एक टक्का आहे. तर ऑनलाइन क्लासचे ९९ टक्के काम बाकी आहे. शिक्षकांनी ऑनलाइन वर्ग विकसित केल्यास विद्यार्थ्यांना ऑफलाइन वर्गांची गरज भासणार नाही. तसेच शिक्षकांची एक समर्पित टीम ऑनलाइन क्लासेस विकसित करत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑफलाइन क्लासेसची गरज भासणार नाही. मी सरकारला एक संघ तयार करण्याचं आवाहन करतो. तसेच ऑनलाइन मोडमध्ये UPSC कोचिंग सुरू करावे, असंही आवाहन करतो. आजकाल बहुतेक लोकांनी कोचिंग सेंटर्समध्ये मार्केटिंग टीम तयार केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी एक प्रकारे ग्राहक बनले आहेत”, असंही आनंद कुमार यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : अनुसूचित जाती, जमातींतही ‘क्रीमिलेयर’ हवे; घटनापीठातील चार न्यायमूर्तींची महत्त्वाची सूचना

दिल्ली कोचिंग सेंटरच्या दुर्घटनेवर दिली प्रतिक्रिया

दिल्लीतील राजेंद्र नगरमधील एका आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात अचानक पावसाचे पाणी शिरल्यामुळे यूपीएससीची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. विद्यार्थ्यांनी या कोचिंग सेंटरवर कारवाई करण्यासाठी आंदोलनही केलं. आता घटनेवर बोलताना आनंद कुमार म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करणं आवश्यक आहे. तसेच या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली पाहिजे. कोचिंग इन्स्टिट्यूटने जीव गमावलेल्या विद्यार्थ्यांना एक कोटी रुपयांहून अधिक नुकसान भरपाई द्यायला हवी. राज्य सरकार, केंद्र सरकार आणि कोचिंग सेंटर्सनी मिळून मृतांच्या कुटुंबीयांना भरपाई द्यायला हवी.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Super 30 founder anand kumar on offline coaching and delhi ias coaching center incident news gkt
Show comments