गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पणजीतून तिकीट न दिल्यास कठीण निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा दिला होता. यावर बोलताना जर पर्रिकरांच्या कुटुंबाने हिंदुत्त्ववादी म्हणून शिवसेनेसोबत संबंध जोडण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच शिवसेना त्यांच्यासाठी ताकद पणाला लावेल. उत्पल पर्रिकर यांनी हिंमत दाखवायला हवी, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊतांनी केलं होतं. दरम्यान, भाजपा आणि उत्पल पर्रिकर यांच्यातील तिढा अजून सुटलेला नाही. त्यातच संजय राऊतांनी महत्वाचं विधान केलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“उत्पल पर्रिकर यांनी पणजी मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविल्यास सर्व गैर-भाजपा पक्षांनी त्यांना पाठिंबा द्यावा, असं आवाहन संजय राऊतांनी केलंय. आम आदमी पार्टी, काँग्रेस, गोवा फॉरवर्ड पार्टी आणि तृणमूल काँग्रेसने उत्पल यांच्या विरोधात उमेदवार देऊ नये. हीच दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना खरी श्रद्धांजली असेल,” असंही राऊत ट्वीट करून म्हणाले.

“मनोहर पर्रिकर हे गोव्याचे प्रमुख नेते होते, गोव्याच्या विकासात त्यांचं नक्कीच योगदान होतं. परंतु त्यांच्या मृत्यू नंतर भाजपाने ज्या पद्धतीने त्यांच्या कुटुंबाशी एकप्रकारे वैर घेतलेलं आहे, ते काय कोणाच्या मनाला पटत नाही. जरी आम्ही वेगळ्या राजकीय पक्षाचे असू, भाजपा विरोधात लढत असलो तरी देखील उत्पल पर्रिकरांचा ज्या प्रकारे अपमान केला जात आहे. पर्रिकरांच्या कुटुंबाबद्दल अशाप्रकारे जे बोलताय त्यांची लायकी काय असं जर आम्ही विचारलं तर?, मला खात्री आहे उत्पल पर्रिकरांना त्यांना उमेदवारी द्यावी लागेल. आम्ही सगळेच जण त्यांच्या पाठीशी उभा राहिलो आहे म्हणून भाजपाला उत्पल पर्रिकरांचा विचार करावा लागतो आहे, तो दिल्लीत केला जातोय. जर उत्पल पर्रिकर अपक्ष लढणार असतील तर सर्वच राजकीय पक्षांनी मतभेद विसरून उत्पल पर्रिकरांच्या मागे ठामपणे उभा रहावं, अशी आमची भूमिका आहे.” असं संजय राऊत यावेळी उत्पल पर्रिकर यांच्याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं.

दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी गोवा विधानसभा निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे, लवकरच जागावाटपाबाबत चर्चा होणार असून शिवसेना १०-१५ जागा लढवेल, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी रविवारी सांगितले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Support manohar parrikars son utpal in goa polls sanjay raut urges to all political party hrc
First published on: 17-01-2022 at 13:01 IST