पीटीआय, नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयात सोमवारी पाच नव्या न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्त्यांमुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ३७ वर पोहोचली असून, वाढीव मंजूर क्षमतेनुसार आता केवळ एक जागा रिक्त राहणार आहे.
केंद्रीय विधि मंत्रालयाच्या न्याय विभागाने सोमवारी सकाळी या संदर्भातील अधिसूचना जारी केली. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील वेंकिटा सुब्रमणी मोहन, तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर, पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शील नागू, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजीव सचदेवा आणि जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अरुण पल्ली यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अवघ्या चार दिवसांत सरकारची मंजुरी
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने २७ मे रोजी या पाच नावांची शिफारस केली होती. त्यानंतर अवघ्या चार दिवसांत केंद्र सरकारने नियुक्त्यांना मंजुरी दिली. दरम्यान, केंद्र सरकारने अलीकडेच अध्यादेशाद्वारे सर्वोच्च न्यायालयातील मंजूर न्यायाधीशांची संख्या ३४ वरून ३८ केली आहे. भारताचे सरन्यायाधीश यांच्यासह ही संख्या लागू होणार आहे.
